छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी घडवलेल्या IED स्फोटात नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कमांडर नितीन भालेराव यांना वीरमरण
शहीद कमांडर नितीन भालेराव नाशिकच्या राजीव नगर भागात राहत होते.
छत्तीसगड मध्ये शनिवारी (28 नोव्हेंबर) रात्री 2 वाजता नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED स्फोटात नाशिकचे सुपुत्र कमांडर नितीन भालेराव शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. या बातमीने संपूर्ण नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 10 जवान गंभीर जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. नितीन भालेराव शहीद झाल्याची बातमी कळताच त्याच्या कुटूंबियांसह नाशिककरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहीद कमांडर नितीन भालेराव नाशिकच्या राजीव नगर भागात राहत होते.
छत्तीसगडमध्ये ताडमेटला परिसरात शनिवारी रात्री 2 च्या सुमारास दहशतवाद्यांनी 2 IED लावून स्फोट घडवून आणला. या स्फोटात सहाय्यक कामांडर नितीन भालेराव यांच्यासह 1 अधिकारी आणि 8 जवान जखमी झाले. नितीन भालेराव यांनी अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अन्य 9 जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.हेदेखील वाचा- जम्मू कश्मीर: श्रीनगर मध्ये HMT भागात लष्करी जवानांवर दहशतवादी हल्ला; 2 जण शहीद
शहीद नितीन भालेराव यांचं पार्थीव रायपूरवरुन विमानाने मुंबईत आणलं जाईल. तिथून ते नाशिकला येईल. त्यानंतर कुटूंबियांसमवेत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती नाशिकच्या जिल्हाधिका-यांनी दिली आहे.
दरम्यान जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील श्रीनगर (Srinagar) जवळील एचएमटी भागांत जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यात दोन जवान शहीद झाले असून त्यापैकी एक जवान महाराष्ट्राचा वीरपूत्र होता. यश देशमुख (Yash Deshmukh) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून तो 22 वर्षांचा होता. जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.