Narayan Rane Press Conference: 'शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे, तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला घाबरत नाही'; उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर नारायण राणे यांची प्रतिक्रिया
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल झाल्या व अखेर संध्याकाळी महाड पोलिसांनी राणे यांना अटक केली
कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारा होता. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल झाल्या व अखेर संध्याकाळी महाड पोलिसांनी राणे यांना अटक केली. रात्री उशिरा महाडच्या स्पेशल कोर्टात राणे यांच्या जामिनाबाबत सुनावणी पार पडली व अखेर त्यांना जामीन मंजूर झाला. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला पदावर असताना अटक होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. या घटनेच्या पार्श्वभुमीवर आज मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेने माझ्याबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यांच्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली व तिथे माझ्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे देश कायद्यावर चालत आहे यावर विश्वास बसतो. सध्या आमची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. यात्रेदरम्यान काहीजण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा घेत आहेत हेही माझ्या लक्षात आले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन 7 वर्षे झाली तसेच नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांची नेमणूक झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी आम्हाला जनतेशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला नवे राजकारण केले.'
पुढे ते म्हणाले, 'मी जे काही बोललो ते फक्त देशाबाबत देशभक्ती असल्याने, माझ्या देशाबाबत मला अभिमान आहे त्यामुळे बोललो.' त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे भूतकाळात केलेली काही वादग्रस्त वक्तव्ये वाचून दाखवली. ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच सेनाभवनाबद्दल बोलताना वापरेले शब्द असंसदीय नव्हते का?' याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, 'हा योगी हवेच्या फुग्यांसारखा आहे. जो फक्त हवेतच उडत राहतो. आले आणि खडाऊ घालून थेट महाराजांकडे गेले. असे वाट आहे, की त्याच चपलेने त्यांना मारावे.'
ते पुढे म्हणाले, 'पोलिसांनी जे करायचे ते केले. तुम्हाला घरे नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे, त्यामुळे मी तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला घाबरत नाही. तुम्ही माझे काही करू शकणार नाही. तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलो आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचे ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावे.'
ते पुढे म्हणाले, 'राज्यात बलात्कार, अत्याचार होताहेत. काय चालले आहे? दिशा सालियनचे काय झाले? त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कायद्यानं लढाई लढणार. देशाबाबत, भाजप पक्षाबाबत, भाजप नेत्यांच्याबाबत जर का कोणी बोलले ते मी सहन करणार नाही.' या यात्रेदरम्यान चांगल्या शब्दात टीका सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 'सामना'मधून केलेल्या टीकेबाबत राणे म्हणाले की, 'हे संपादकीय नाहीच, फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी हे लिहिण्यात आले आहे. याबाबतचे उत्तर मी 17 सप्टेंबरनंतर देईन.'
काय आहे प्रकरण?
महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रा पोहोचल्यावर यात्रेदरम्यान सोमवारी, 23 ऑगस्ट रोजी बोलताना नारायण राणे म्हणाले की, 'त्या दिवशी नाही का, किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.' या वक्तव्यामुळे मुळे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. त्यानंतर राज्यात नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या.
दरम्यान, काल केंद्रीय मंत्री नारायण यांना नोटीस बजावून नाशिक पोलिसांची टीम माघारी परतली. नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यासंदर्भात राणे यांना 2 सप्टेंबरला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असे नारायण राणे यांनी न्यायालयात लिहून दिले म्हणून त्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली नाही.
नारायण राणे यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राणेंच्या याचिकेत पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी होती. यावर नुकतीच सुनावणी पार पडली व न्यायालयाने नाशिक पोलिसांना सध्या तरी कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला पार पडणार आहे. मात्र राणे यांना पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत अजूनतरी कोणताही दिलासा मिळाला नाही.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य, अटक आणि जामिनावर सुटका अशा बातम्यांच्या दरम्यान, एक कथित व्हिडीओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिस अधिकाऱ्यांना नारायण राणेंना विनाविलंब अटक करण्याच्या सुचना देताना ऐकू येत आहे. पोलीस फोर्स वापरून राणे यांना ताब्यात घ्या असे परब या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. आता पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (हेही वाचा: नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; 17 सप्टेंबर पर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही राज्य सरकारकडूनही ग्वाही)
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि राज्यातील एक शक्तिशाली नेते समजले जाणारे राणे, आता ठाकरे कुटुंबाचे अर्थात उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे विरोधक मानले जातात.