Narayan Rane: उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण उरलंय? प्रकाश आंबेडकर यांनी कोणती निवडणूक जिंकली? नारायण राणे यांची नव्या युतीवर टीका
या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात वेगळे वळण पाहायला मिळण्याची जोरदार चर्चा सुरु झाली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेत वंचित बहुजन आघाडीसोबत युती (Uddhav Thackeray Alliance With VBA) करत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात वेगळे वळण पाहायला मिळण्याची जोरदार चर्चा सुरु झाली. ही युती भारतीय जनता पक्षाला मात्र फारशी रुचल्याचे पाहायला मिळत नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी तर या युतीवर थेट टीकास्त्र सोडले असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता उरलंयच कोण? आणि प्रकाश आंबेडकर यांनी आजवर कोणती निवडणूक जिंकली आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.
56 पैकी 40 गेले
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत आता कोण उरलंय? एकूण 56 आमदार होते. त्यातले आता 40 गेले. आता त्यांच्याकडे 12 सुद्धा उरले नाहीत. आता त्यांच्याकडे काहीच राहिले नाही. त्यांचा एकही कार्यकर्ता आता जमीनीवर उतरत नाही. आतापर्यंत तरी उतरला आहे का? असा सवालच राणे यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray Alliance With VBA: महाविकासआघाडीला चौथा मित्र, वंचित बहुजन आघाडीसोबत युतीची उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घोषणा)
प्रकाश आंबेडकर यांनी दलितांसाठी काय केले?
प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत एक तरी निवडणूक जिंकली आहे काय? इतकेच नव्हे तर, प्रकाश आंबेडकरांनी आजवर किती दलितांना मदत केली? किती घरे बांधली? असे प्रश्न विचारतानाच नारायण राणे यांनी म्हटले आहे की, लोकांसाठी काम करणार्या पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याबद्दल उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना बोलण्याची अधिकारच नाही.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती होत असल्याची घोषणा आज संयुक्तरित्या केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्या या नव्या युतीमुळे एकनाथ शिंदे गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.