कोकणवासीयांच्या प्रयत्नांना यश; कोकणात होणारा नाणार प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा
या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहे.
अखेर कोकणवासीयांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहे. तसेच जमिनींच्या सातबारावर असलेला एमआयडीची शिक्काही हटवण्यात येणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही घोषणा केली, तसेच जिथे स्वागत असेल तिथे हा प्रकल्प उभा केला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. सुरुवातीपासून या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध होता. याबाबत अनेक बैठकाही पार पडल्या होत्या. शेवटी आज राज्य सरकारने कोकणातून हा प्रकल्प हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपासोबत युतीचा निर्णय घेण्यापूर्वी नाणार प्रकल्प रद्द करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनीही हा प्रकल्प रद्द करावा असे सांगितले होते. नाणार परिसरातील रहिवासी, मुंबईकर मंडळी आणि कोकणातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती. आता सरकारने हा प्रकल्प कोकणात स्थापन करण्याचा विचार बदलला आहे. (हेही वाचा: ‘हा नीचपणा जितका आहे तितकाच निर्घृणपणा आहे’; उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘जठाराग्नी’ शांत करण्याचा सल्ला)
सौदी अरेबियातील सौदी आराम्को कंपनी या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार होती. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची 50 टक्के भागीदारी असणार होती. मात्र यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झाली असती असे स्थानिक रहिवाश्यांचे मत ठरले. आता जिथली जनता या प्रकल्पासाठी अनुकूल असेल तिथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे.