नाना कितीही खराब असला तरी असले गैरवर्तन करणार नाही; राज ठाकरेंचा पाठींबा

एकट्या पडलेल्या नानांच्या मदतीला धावून आले आहेत त्यांचे मित्रवर्य चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे.

राज ठाकरे (Photo Credits: PTI)

एका अभिनेत्रीने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांना आता गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभिनेत्रीचे आरोप, नानांची प्रतिक्रिया, तिने दाखल केलेला गुन्हा, नानांची 1 मिनिटांची पत्रकार परिषद या सर्व गोष्टी पाहता या गुंत्यातून नाना लवकर सहीसलामत बाहेर पडणे थोडे अशक्य आहे. यातच बॉलीवूडमधील अनेक दिगज्जांनी या अभिनेत्रीला पाठींबा दर्शवल्यानंतर तर नानांची अडचण अजूनच वाढली आहे. याच मुद्यावरून नानांना ‘हाऊसफुल 4’मधूनही बाहेर पडावे लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकट्या पडलेल्या नानांच्या मदतीला धावून आले आहेत त्यांचे मित्रवर्य चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे.

‘नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य, काही वेळा त्याचे वर्तन असभ्य असते हेही मान्य पण या अभिनेत्रीने जे आरोप लावले आहे असे काही नाना करेल हे मान्य नाही’ असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली. विदर्भ दौऱ्यावर असलेले राज ठाकरे काल अमरावती येथील अंबा फेस्टिव्हल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीत बोलत होते.

नानाची बाजू घेत पुढे, ‘या आरोपांमधील तथ्य पडताळून यावर न्यायालय जो काही असेल तो निर्णय देईल. मात्र याबाबत सोशल मिडियावर लोकांनी कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणे योग्य नाही. #MeToo हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मात्र याबाबत सध्या पेटलेल्या वातावरणामुळे त्याचे गांभीर्य कमी होत आहे.’ असे मत त्यांनी मांडले.

या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टोला मारण्याची संधी चुकवली नाही. ‘कदाचित पेट्रोलच्या वाढत्या किंमती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आणि नोकऱ्यांची कमतरता, देशातील बेरोजगारी अशा महत्वाच्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या ‘मी-टू’ मोहिमेचा उपयोग केला जात आहे. मात्र कोणत्याही महिलेच्या बाबतील अन्याय झाला किंवा असभ्य वागणूक झाली तर तिने न घाबरता लगेच मनसेशी संपर्क करावा, आम्ही त्या महिलेला शक्य ती मदत करू’ असे ते म्हणाले.

ही अभिनेत्री आणि नाना यांमध्ये पेटलेल्या वादामध्ये मनसेदेखील सामील आहे. ‘10 वर्षांपूर्वी चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकरांच्या सांगण्यावरूनच मनसेच्या लोकांनी सेट वर येऊन राडा घातला होता, माझ्या गाडीची तोडफोड केली होती, शारीरिकदृष्ट्या मला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता’ असे आरोप या अभिनेत्रीने मनसेवर लावले आहेत.