'सर्व महाविद्यालयांची नावे आणि कार्यालयीन संभाषणामध्ये मराठीचा वापर अनिवार्य'; Mumbai University चे निर्देश
विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका यापूर्वीच मराठीत छापल्या जातात
मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) आपल्या संलग्न महाविद्यालयांना सर्व अधिकृत संभाषणात केवळ इंग्रजीच नव्हे, तर मराठीचा (Marathi) वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यापीठाने शुक्रवारी जारी केलेल्या परिपत्रकात महाविद्यालयांनी त्यांची नावे ठळक मराठी अक्षरात आणि दृश्यमान ठिकाणी दाखवावीत, असे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशाचे विवरणपत्र मराठीतही उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. या परिपत्रकात महाविद्यालयांना सर्व अधिकृत पत्रव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या सूचना मराठीत जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच महाविद्यालयीन कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्येही मराठी भाषेला प्राधान्य देण्यास सांगितले आहे. शेवटी, महाविद्यालयांना दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी वादविवाद, स्पर्धा आणि इतर कार्यक्रम आयोजित करून मराठी भाषा दिन पाळण्यास सांगण्यात आले आहे. हे निर्देश जारी करणारे विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक म्हणाले, ‘हे नियम पूर्वीच्या सरकारी परिपत्रकांनुसार आहे, तसेच ते संलग्न सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर महाविद्यालयांना लागू आहे.’
अनेक महाविद्यालये आधीच विद्यापीठाने पारित केलेल्या काही निर्देशांचे पालन करत आहेत. विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका यापूर्वीच मराठीत छापल्या जातात. गेले अनेक वर्षे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या युवासेनेची ही मागणी होती.
याबाबत एक प्राचार्य म्हणाले, ‘महाविद्यालयाचे विवरणपत्र दोन भाषांमध्ये छापणे आमच्यासाठी कठीण जाईल. सूचना आणि नावे दोन्ही भाषांमध्ये नमूद करणे शक्य आहे, पण कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये मराठीला प्राधान्य द्यायला सांगणे अवघड आहे, कारण आमच्या काही कार्यशाळांमध्ये देशभरातील लोक हजेरी लावतात.’