Nagpur Shocker: एकतर्फी प्रेमातून घरात घुसून तरुणीच्या आजीसह लहान भावाची हत्या; परिसरात खळबळ

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीची आणि लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

आज (10 डिसेंबर) एका दुहेरी हत्याकांडाने नागपूर (Nagpur) हादरलं आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीची आणि लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली. नागपूर मधील हजारीपहाड परिसरातल्या कृष्णनगरमध्ये राहणाऱ्या धुर्वे कुटुंबियांच्या घरात ही घटना घडली. धुर्वे यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम असल्याने तरुणाने घरात घुसून आजी आणि लहान भावाची धारधार हत्याराने वार करत हत्या केली. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, लक्ष्मीबाई धुर्वे (65) आणि यश धुर्वे (10) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गांधीबाग परिसरातील एक तरुण अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीच्या मागे लागला होता. धुर्वे कुटुंबियांनी समजावल्यानंतर मुलीने तरुणासोबतचे सर्व संबंध तोडले होते. तरीही सतत तो धुर्वे राहत असलेल्या परिसरात यायचा. त्यामुळे धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नागपूरमध्ये दुसऱ्या भागात राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवले. (Jodhpur Murder: धक्कादायक! पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळच खेळत बसला गेम; राजस्थान येथील घटना)

तरुणीने संपर्क तोडल्यामुळे अधिकच बिथरलेल्या मुलाने आज धुर्वे कुटुंबियाच्या घरी जावून तरुणीच्या आजी आणि लहान भावाचा खून केला. यावेळी धुर्वे दांपत्य कामावर गेले होते. धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाज आणि भर दिवसा हा प्रकार घडल्याने शेजाऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी तरुण तेथून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच धुर्वे दाम्पत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.

हत्या, आत्महत्येच्या अनेक घटना देशभरातून समोर येत असतात. यापूर्वी नाशिक येथून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली होती. एका ज्येष्ठ महिलेची हत्या करुन दागिने  लंपास केलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तसंच चोरी लपवण्यासाठी एका तरुणाने 9 वर्षांच्या मुलाचा खून केला होता.