Nagpur Shocker: माणुसकीला काळीमा! जोडप्याने 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 5 दिवस बाथरूममध्ये कोंडले; वीज अधिकाऱ्यांनी केली सुटका, प्रायव्हेट पार्टसवर भाजल्याचा जखमा
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) येथून एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 10 वर्षीय मुलीला पाच दिवस बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी शुक्रवारी, 1 सप्टेंबर रोजी याबाबत माहिती दिली. जेव्हा मुलीला सोडवण्यात आले तेव्हा तिच्या तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या, तसेच तिचे प्रायव्हेट पार्टस भाजले होते.
नागपूरचे डीसीपी विजयकांत सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसा-पिपळा रोडवरील अथर्व नगरी येथील घरात राहणारे दाम्पत्य या मुलीला घर कामासाठी घेऊन आले होते. मात्र त्यांनी मुलीला बाथरूममध्ये बंद केले आणि तिच्यासाठी काही ब्रेडची पाकिटे ठेवून ते बाहेरगावी निघून गेले.
काही दिवसांनी घराचे वीजबिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्यासाठी जेव्हा वीज विभागाचे कर्मचारी फ्लॅटवर पोहोचले तेव्हा मुलीने खिडकीतून मदतीची याचना केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर या सर्वांनी घराचे कुलूप तोडून मुलीची सुटका करण्यात आली. ताहा अरमान इस्तियाक खान असे आरोपीचे नाव असून तो विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली. (हेही वाचा: Washim Rape Case: घरी एकटी असताना अल्पवयीन मुलीचा शेजारच्यानी घेतला फायदा, आरोपीला अटक; मालेगावातील धक्कादायक घटना)
दुसरीकडे आरोपीची पत्नी हिना आणि मेहुणा अजहर पळून गेले. या दोघांना पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध मानवी तस्करी, बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, धमकावणे, प्राणघातक हल्ला असे आरोप नोंदवले आहेत. यासह लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा आणि बाल न्याय कायद्याच्या अनेक तरतुदी लागू केल्या आहेत.