Nagpur: 94 वर्षीय महिला तब्बल 40 वर्षांनंतर इंटरनेटच्या मदतीने आपल्या घरी परत; जाणून घ्या नक्की काय घडले
इंटरनेट वापराचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहे. मात्र कोणी काहीही म्हणो इंटरनेटमुळे एका आजीबाईंना तब्बल 40 वर्षांनतर आपला परिवार गवसला आहे. होय, पंचुबाई (Panchubai) असे या आजींचे नाव आहे,
सध्या इंटरनेट (Internet) आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. इंटरनेट वापराचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहे. मात्र कोणी काहीही म्हणो इंटरनेटमुळे एका आजीबाईंना तब्बल 40 वर्षांनतर आपला परिवार गवसला आहे. होय, पंचुबाई (Panchubai) असे या आजींचे नाव आहे, ज्यांची 40 वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाशी ताटातूट झाली होती. मात्र तीन 3 दिवसांपूर्वी त्या नागपूरला (Nagpur) आपल्या नातवाच्या घरी पोहचल्या मात्र दुर्दैवाने आपल्या मुलाला त्या भेटू शकल्या नाहीत, कारण 3 वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण 1979-80 मध्ये मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील रस्त्यावर, एका ट्रक चालकाला एक महिला गरीब, दयनीय अवस्थेत आढळली. या ट्रकचालकाचा मुलगा इसरार खानने सांगितले की, या महिलेला नीट बोलताही येत नव्हते. खानच्या वडिलांनी या महिलेस आपल्या घरी आणले आणि ती खानच्या कुटूंबासोबत राहू लागली. इसरार स्वत: त्यावेळी लहान मुलगा होता. इसरारने सांगितले की, ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर होती आणि अधूनमधून मराठीत गाणी गुणगुणायची. मी तिला तिच्या कुटूंबियांबद्दल अनेक वेळा विचारले पण ती काही बोलू शकली नाही.
खानने फेसबुकवर या महिलेबद्दल लिहिले होते, मात्र या महिलेची काहीच माहिती समोर आली नाही. त्यानंतर असेच अनेक वर्षे निघून गेली व ही महिला खान कुटुंबाचा हिस्सा बनली. यंदा 4 मे रोजी पुन्हा या महिलेला तिच्या कुटुंबाबद्दल विचारले असता तिने परसपुर गावाबद्दल सांगितले. गुगलच्या मदतीने शोधले असता महाराष्ट्रात परसपुर असल्याचे आढळले. पुढे इसरारने 7 मे रोजी परसपुर येथील अभिषेक नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधून अभिषेकला या महिलेचा व्हिडिओ पाठवला. (हेही वाचा: बेल्जीयन व्यक्तीला मागील 9 वर्षांपासून ऑर्डर न करता मोफत मिळतेय पिझ्झा डिलिव्हरी; काय आहे ही Mystery?)
अभिषेकने हा व्हिडिओ आपल्या Whatsapp Group मध्ये शेअर केला व अखेर या महिलेची ओळख पटली. इतकेच नाही तर तिच्या कुटुंबाचीही माहिती मिळाली. नागपुरात राहणाऱ्या पृथ्वी भैय्यालाल शिंगणे या कुटुंबाने हा व्हिडिओ पहिला व ही महिला या कुटुंबाची आज्जी असल्याचे समजले. त्यानंतर ताबडतोब 17 जून रोजी या आजीबाईंना आपली घरी नागपूरला आणण्यात आले. 1979 साली या आजींच्या मुलाने त्यांना खानजमा नगर येथून नागपुरात उपचारासाठी आणले होते, मात्र अचानक एके दिवशी या आजी घरातून गायब झाल्या होत्या. आता 40 वर्षानंतर त्या इंटरनेटच्या मदतीने आपल्या घरी पोहोचल्या आहेत.