Nagnath Kottapalle Dies: ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन
नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. फुफ्फुसांच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कथा, कादंबरी, समिक्षा यासाठी त्यांनी लेखन केले आहे. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.
नागनाथ कोत्तापल्ले यांनी ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यावर जोतिपर्व लिहले आहे. तर 'राजधानी', 'वारसा', 'सावित्रीचा निर्णय' या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. 'गांधारीचे डोळे', 'मध्यरात्र', 'पराभव' या त्यांच्या कादंबऱ्या रसिकांच्या पसंतीला उतरल्या होत्या. सामाजिक भान असलेले साहित्यिक आणि सोबतीने कुलगुरू पद सांभाळत असलेल्या कोत्तापल्ले यांनी कॉपीमुक्ती अभियान यशस्वी पणे राबवले. अशी कामगिरी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले आहेत. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रानेच विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपीमुक्ती स्वीकारली. नक्की वाचा: Vikram Gokhale Passes Away: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, पुणे येथे 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास .
मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात 19 वर्षे अध्यापनाचे काम नागनाथ कोत्तापल्ले यांनी केलं आहे. नंतर ते 1996 ते 2006 या काळात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख ते राहिले आहेत. 2005 ते 2010 अशी पाच वर्षे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरु होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड मधील आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर देगलूर महाविद्यालयातून पदवी घेतली. पुढे एम. ए. चं शिक्षण मराठवाडा विद्यापीठातून घेतलं. त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्यावर पीएचडी केली होती.