COVID19 वरील लसीच्या डोसचा तुटवडा पडल्याने मुंबईतील लसीकरण थांबणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

मात्र कोरोनावरील लसीचा तुडवडा सध्या राज्यासह मुंबईत भासत चालल्याने आता शुक्रवार पासून लसीकरण थांबणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: ANI)

Coronavirus Vaccination: मुंबईत सध्या कोरोनाच्या लसीकरणाला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात आहे. मात्र कोरोनावरील लसीचा तुटवडा सध्या राज्यासह मुंबईत भासत चालल्याने आता शुक्रवार पासून लसीकरण थांबणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. PTI सोबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले की, ज्या शहरात कोरोनाच्या लसीचे पुरेसे डोस आहेत तेथेच लसीकरण सुरु राहणार आहे. तर आज कोरोनाच्या लसीकरणाचा शेवटचा दिवस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे.(Mumbai: ऑनलाईन फूड डिलिव्हरीसह अत्यावश्यक सेवासुविधांना 24 तास परवानगी-BMC)

महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीची गंभीर स्थिती निर्माण झाली असून त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. लसीचा तुटवडा असल्याने पहिल्या लसीचा डोस घेतलेल्यांना दुसरा डोस सुद्धा घेता येणार नाही आहे. त्याचसोबत खासगी रुग्णालयांच्याबाहेर सुद्धा कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्याने त्या संदर्भात बोर्ड लावले आहेत.

दरम्यान, 7 एप्रिल पर्यंत 15.52 लाख लसीचे डोस अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्ससह अॅडमिनिस्ट्रेट मधील लोकांना दिले गेले. त्यापैकी आता 1.72 लाख जणांना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस देणे राहिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले की, राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाच्या लसीचे डोस संपल्याने लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत.(Ajit Pawar on Mask: भाषणादरम्यान आलेली चिठ्ठी पाहून अजित पवार भडकले म्हणाले 'हा शहाणा मला सांगतोय')

तर  मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाच्या आणखी 8938 रुग्णांची भर पडली असून 23 जणांचा बळी, महापालिकेने माहिती दिली आहे. त्याचसोबत गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नागरिकांनी जरी कोरोनाची लस घेतली असली तरीही मास्क घालणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालल्याने राज्यात संचारबंदीसह सेमी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर राज्यातील विविध ठिकाणी अत्यावश्यक सेवासुविधा वगळता अन्य गोष्टी येत्या 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.