मुंबईकरांनो व्हा सावध! अनोळखी अॅप्सद्वारे ऑनलाइन खरेदी केलेली अनेक दैनंदिन उत्पादने निघाली बनावट
डुप्लिकेट उत्पादने आणि खाण्यायोग्य वस्तूंमुळे सरकारी तिजोरीचे नुकसान तर होतेच, मात्र यामुळे लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो.
रोजच्या वापराच्या वस्तूंच्या संदर्भात मुंबईकरांची (Mumbai) होत असलेल्या फसवणुकीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, मुंबईकर अनोळखी अॅप्सद्वारे ऑनलाइन खरेदी करत असलेल्या अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू डुप्लिकेट आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठ महिन्यांत पाच कोटी रुपयांच्या दैनंदिन गरजा म्हणून वापरल्या जाणार्या बनावट कॉपीराइट वस्तू आणि खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात 61 जणांना अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे शाखा क्राईम ब्रँच (CB) कंट्रोल युनिटच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत कॉपीराइट उत्पादनांशी संबंधित 14 प्रकरणे आणि इतर डुप्लिकेट उत्पादनांशी संबंधित 11 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आरोपींची दुकाने आहेत आणि त्यातील अनेक उत्पादने ऑनलाइन विकली जातात. तपासादरम्यान, आढळले की मुंबईतील लोक दैनंदिन गरजेची उत्पादने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरत आहेत, परंतु अपरिचित अॅप्सद्वारे खरेदी केलेली 99 टक्के उत्पादने बनावट आणि डुप्लिकेट आहेत.
खऱ्या उत्पादनांच्या तुलनेत ऑनलाइन उपलब्ध मालाचे दर स्वस्त असल्याने लोक बळी पडतात. यावर्षी फ्लोअर क्लीनर, मेक-अप आयटम, ब्रँडेड शूज, आयफोन मोबाईल अॅक्सेसरीज, सिंगल-टच डायबेटिक मशीन, मीठ, जीन्स इत्यादी डुप्लिकेट कॉपीराइट उत्पादने जप्त केली आहेत. डुप्लिकेट उपभोग्य उत्पादनांमध्ये पाम तेल, पनीर, दूध, बाईक, घड्याळे, ई-सिगारेट आणि इतर वस्तू यांचा समावेश आहे. (हेही वाचा: सावधान! पोलिस आयुक्तांचा फोटो वापरुन मेसेजद्वारे मुंबईकरांची फसवणूक)
अधिकाऱ्यांनी लोकांना जवळपासची दुकाने, मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन त्यांची एक्सपायरी डेट आणि कंपनीचे नाव तपासल्यानंतर उत्पादने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. डुप्लिकेट उत्पादने आणि खाण्यायोग्य वस्तूंमुळे सरकारी तिजोरीचे नुकसान तर होतेच, मात्र यामुळे लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. अधिकारी अशा बनावट कॉपीराईट विक्रीवर आणि डुप्लिकेट उत्पादनांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.