Mumbai Water Supply: मुंबई मध्ये 16 जून पासून बीएमसी सोडणार राखीव साठ्यातील पाणी

जूनमध्ये तलावांच्या पातळीत घट होणे असामान्य नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे कारण मान्सूनच्या पावसाचा वेग सामान्यतः जुलैमध्येच वाढतो, ज्यामुळे तलाव पुन्हा भरण्यास मदत होते. जुलैमध्ये सातत्याने पाऊस पडल्यानंतरच तलावांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते.

Mumbai Water Supply: मुंबई मध्ये 16 जून पासून बीएमसी सोडणार राखीव साठ्यातील पाणी
Water | Pixabay.com

मुंबईकरांना सध्या मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाने मागील 15-20 दिवसांपासून दडी मारल्याने सध्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान शमवण्यासाठी आता बीएमसी साठवणूकीतील पाणी सोडणार आहे. मिड डे च्या रिपोर्टनुसार, 16 जून पासून मुंबई महानगरपालिका reserve water stock मधील पाणी सोडणार आहे. 13 जूनच्या माहितीनुसार, मुंबईत सात तलावक्षेत्रामध्ये 9.21% म्हणजे केवळ 133364 मिलियन लीटर पाणी शिल्लक होते. मुंबई मधील तलावांची पाण्याची पूर्ण क्षमता 1,447,363 ML (million litres) आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. वैतरणा नदीवर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि मोडक सागर या तलावांचा समावेश आहे. शहराला पुरवठ्यासाठी अप्पर वैतरणा नदीतून मध्य वैतरणा आणि मोडक सागर या खालच्या तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. हा पुरवठा पुढील दोन दिवस पुरेल, त्यानंतर 16 जूनपासून अप्पर वैतरणा तलावातून राखीव पाणीसाठा वापरला जाईल.

अप्पर वैतरणा तलाव राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो आणि जलविज्ञान विभागाच्या माहितीनुसार, दरवर्षी वापरासाठी बीएमसीला विशिष्ट प्रमाणात पाणी दिले जाते. गेल्या 24 तासांत, या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 103 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

जूनमध्ये तलावांच्या पातळीत घट होणे असामान्य नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे कारण मान्सूनच्या पावसाचा वेग सामान्यतः जुलैमध्येच वाढतो, ज्यामुळे तलाव पुन्हा भरण्यास मदत होते.  जुलैमध्ये सातत्याने पाऊस पडल्यानंतरच तलावांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं ही  मुंबईच्या बाहेरील भागात तसेच ठाणे आणि नाशिक येथे आहेत. दोन सर्वात लहान तलावं तुळशी आणि विहार ही बोरिवलीच्या  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहेत परंतु ती शहराच्या गरजांपैकी फक्त 1-2% पाण्याची गरज पूर्ण करतात. शहराला  भातसा तलावातून 50% पेक्षा जास्त पाणीपुरवठा केला जातो.

 

 

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).