Mumbai: अटक टाळण्यासाठी चोराने मारली चौथ्या मजल्यावरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचताच त्या व्यक्तीने चौथ्या मजल्यावरून शेजारील विश्व महल इमारतीच्या आवारात उडी मारली.

Death (Photo Credits-Facebook)

मुंबईमध्ये (Mumbai) चोरी करण्यासाठी आलेल्या चोराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अटक टाळण्यासाठी या 25 वर्षीय चोराने थेट निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. अपघातानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शुक्रवार, 8 जुलै रोजी मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात ही घटना घडली. रोहित असे मृत्यू झालेल्या चोराचे नाव आहे. मरिन ड्राइव्ह परिसरातील जयंत महल सोसायटीतील रहिवासी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास चोर इमारतीत घुसला होता.

इमारतीच्या एका गेटवर चौकीदार तैनात होता. त्यामुळे चोरट्याने दुसऱ्या गेटवरून उडी मारून इमारतीत प्रवेश केला. परंतु या चौकीदाराला चोराचा संशय आल्याने त्याने तत्काळ अलार्म वाजवून इमारतीतील रहिवाशांना याची माहिती दिली. त्यानंतर एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान इमारतीजवळ पोहोचले. पोलिसांना पाहताच चोर ड्रेन पाईप व खिडकीच्या साहाय्याने इमारतीवर चढला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला.

पोलिसांनी त्याला अटक करणार नाही असे आश्वासन देऊन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. चोर खाली आला नाही. अखेर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकाऱ्यांनी प्लास्टिक सुरक्षा जाळी पकडली आणि चोराला त्यात उडी मारण्यास सांगितले. काही रहिवाशांनी त्याला  चौथ्या मजल्यावरील घरातच राहण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.

अखेर तीन तासांच्या संघर्षानंतर, सुरक्षा बेल्टचा वापर करून एक पोलीस अधिकारी सकाळी 7.15 च्या सुमारास चौथ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उतरला. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचताच त्या व्यक्तीने चौथ्या मजल्यावरून शेजारील विश्व महल इमारतीच्या आवारात उडी मारली. उडी मारताना तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. आता पोलीस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोराला हिंदी आणि बंगाली भाषा येत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित चोरीच्या उद्देशाने इमारतीत घुसला होता. पोलिसांनी रोहितविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 511 आणि 304 ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.