मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: बोरिवली ते मालाड पश्चिम चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

जाणून घ्या मुंबईतील बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीसाठी कुणामध्ये होणार चुरशीची लढत?

Mumbai Suburban (File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019:  महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदार संघांमध्ये यंदा 21 ऑक्टोबर दिवशी मतदान होणार आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विधानसभेच्या 34 जागा आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर झेंडा रोवायचा असेल तर सार्‍याच पक्षांना मुंबई मध्ये आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपा महायुतीने 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीमध्ये अनुक्रमे 14 आणि 15 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदाही मुंबई शहरावर वर्चस्व राखण्यासाठी सारेच पक्ष कसोशीने प्रयत्न करणार आहेत. सध्या मुंबईमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि शिवसेनेमध्ये दाखल झाल्याने कमकुवत झालेल्या विरोधकांचा युतीला फायदा होऊ शकतो. मग जाणून घ्या मुंबईतील बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये पहा काय आहे स्थिती?  

बोरिवली विधानसभा मतदार संघ  

 2014 साली शिवसेनेच्या उमेदवारावर मात करत भाजपाच्या विनोद तावडेंनी बोरिवली विधानसभा मतदार संघावर विजयी पताका रोवला होता. यंदा भाजपाने विनोद तावडेंचं विधानसभेचं तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघामध्ये कुमार खिलारे यांना कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात आलं आहे. एकनाथ खडसे ते राज पुरोहित; भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कापली या 7 बड्या नेत्यांची तिकीटं

दहिसर विधानसभा मतदार संघ  

2014 मध्ये मनिषा चौधरी यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांचा पराभव केला होता. दहिसरमध्येही भाजपा पक्षाचे वर्चस्व आहे. सध्या या मतदारसंघातून कॉंग्रेसने अरविंद सावंत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजेश येरूणकर यांना तिकीट दिले आहे. 

मागाठणे विधानसभा मतदार संघ  

2014 साली मागाठणे विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी भगवा फडकावला होता. हेमेंद्र मेहता या  भाजपाच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला होता. त्या वेळेस मनसे पक्षाचे माजी आमदार प्रवीण दरेकर तिसऱ्या स्थानावर होते. मात्र आता प्रवीण दरेकर भाजपामध्ये दाखल झाले आहेत. सध्या या मतदारसंघात प्रकाश सुर्वे यांना शिवसेनेकडून तर मनसेने नयन कदम यांना उमेदवारी दिली आहे.  

कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघ 

2014 च्या निवडणूकीत महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता. यंदा निवडणूकीच्या रिंगणात मनसेने हेमंत कांबळे यांना तिकीट दिलं आहे.

चारकोप विधानसभा मतदार संघ  

भाजपच्या योगेश सागर यांनी सलग दुसऱ्यांदा 2014 साली या मतदारसंघातून आमदारकी मिळवली होती. शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांचा त्यांनी  पराभव केला होता. 

मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघ  

मालाड पश्चिमेत काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत. ते सलग दोनदा आमदार झाले आहेत. यंदाही अस्मल शेख निवडणूकीच्या रिंगणात  आहेत. त्यांच्या विरूद्ध भाजपाचे रमेशसिंग राठोड निवडणूक लढणार आहेत.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.