Mumbai: धक्कादायक! तीन महिन्यात दोन वेळा Covid-19 चा संसर्ग; नैराश्येमधून जोडप्याने केली आत्महत्या, 10 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
येथे, तीन महिन्यात दोनवेळा कोविड-19 चा संसर्ग झाल्याने आलेल्या नैराश्येमधून एका दाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. या जोडप्याने मध्य मुंबईतील भारत मिल्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आपले जीवन संपवले
गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत व आता तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. या काळात भारतामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता मुंबईमधून (Mumbai) एक धक्कादायक बाब समोर येत आहे. येथे, तीन महिन्यात दोनवेळा कोविड-19 चा संसर्ग झाल्याने आलेल्या नैराश्येमधून एका दाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. या जोडप्याने मध्य मुंबईतील भारत मिल्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आपले जीवन संपवले.
बुधवारी त्यांचे मृतदेह ताब्यात घेणार्या वरळी पोलिसांनी माहिती दिली की, जोडप्याने मागे सुसाईड नोट सोडली आहे, ज्यामध्ये नमूद केले आहे की तीन महिन्यात दोन वेळा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने आत्महत्या करीत आहोत. पोलिसांनी या जोडप्याचे नाव अजय कुमार आणि पत्नी सुजा असल्याचे सांगितले आहे. दहा महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते आणि ते वरळीतील भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत होते.
वरळी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कोळी म्हणाले की, ‘अजय नवी मुंबईत एका खासगी कंपनीत काम करत होता, तर त्याची पत्नी फोर्टमध्ये एका बँकेत नोकरी करत होती. या जोडप्याला एप्रिलमध्ये कोविड-19 ची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये विषाणूची लक्षणे दिसू लागली होती. याच नैराश्येमधून त्यांनी आत्महत्या केली.’ (हेही वाचा: COVID-19 Vaccination: मुंबईत हिरानंदानी इस्टेट वसाहतीमध्ये बनावट लसीकरण मोहिमेत फसवणूक झालेल्यांना BMC आज पुन्हा देणार लस)
बुधवारी सुजाच्या आईने तिच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फोन उचलला गेला नाही. त्यानंतर सुजाच्या आईने त्याच इमारतीत राहणार्या तिच्या एका मित्राकडे चौकशी केली. मित्र त्यांच्या घरी गेला पण आतून कोणीही दरवाजा उघडला नाही, त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सुजाचा मृतदेह लिव्हिंग रूममध्ये आढळला तर, अजयचा मृतदेह स्वयंपाकघरात सापडला.
त्यानंतर या दोघांना तातडीने नायर इस्पितळात दाखल करण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कोळी म्हणाले की, ‘शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले आहे की त्यांनी स्वत: विषप्राशन केले होते.’