Mumbai Shocker: खोट्या लोन रिकव्हरी एजंटकडून तरुणाचा मानसिक छळ; बलात्कारी म्हणून हिणवले, 35 लोकांना पाठवले मॉर्फ केलेले फोटो
सोबतच त्याने पैसे दिले नाही तर त्याचे मॉर्फ केले फोटो त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवले जातील, अशी धमकीही देण्यात आली.
मुंबईमध्ये (Mumbai) कर्ज वसुली एजंट असल्याचे भासवून फसवणूक करण्याच्या इराद्याने छळवणूकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, मालाड-पूर्व (Malad) येथील 27 वर्षीय दीपक दुबे याला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दीपक दुबे याने लोन अॅप वरून काही रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याने 30 जूनपर्यंत 3,500 रुपयांच्या व्याजासह 3,500 रुपये कर्जाची रक्कम भरली होती. मात्र, 7 जुलै रोजी त्याला एका व्यक्तीचा फोन आला की, त्याने ज्या 'एजंट'ला कर्जाची रक्कम दिली होती, तो फसवा होता, त्यामुळे त्याला पुन्हा ही रक्कम भरावी लागेल.
ही बाब इथेच थांबली नाही तर, दीपकला मेसेजेस यायला लागले ज्यामध्ये त्याला ‘बलात्कारी’ असे म्हटले होते. सोबतच त्याने पैसे दिले नाही तर त्याचे मॉर्फ केले फोटो त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवले जातील, अशी धमकीही देण्यात आली. त्यानंतर दीपकच्या संपर्क यादीतील 35 जणांना त्याचे मॉर्फ केलेले फोटो मिळाले आणि त्यात लिहिले होते की, ‘तो एक बलात्कारी आहे आणि त्याने कर्ज घेतले आहे जे तो चुकवू शकला नाही.’
याबाबत दीपक म्हणाला, ‘मी 17 जून रोजी कर्ज घेतले होते. त्याची फी भरल्यानंतर 23 जूनपर्यंत मी पैशांची व्यवस्था करू शकलो नाही त्यामुळे, कर्जाची पेमेंट तारीख 30 जूनपर्यंत वाढवून घेतली. 30 जून रोजी, मला एका रिकव्हरी एजंटकडून कॉल आला की, मी आधीच घेतलेले कर्ज चुकते केल्यास मला 600 रुपयांची सूट दिली जाईल. 7 जुलै रोजी एजंटनी पुन्हा फोन करून मला शिवीगाळ केली आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत माझे मॉर्फ केलेले फोटो माझ्या संपर्कातील लोकांना प्रसारित करण्यात आले.’ (हेही वाचा: Mumbai: पत्नीपासून प्रेमसंबंध लपवण्यासाठी पुरुषाने उचलले असे पाऊल, जावे लागले तुरुंगात, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
यानंतर या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. कुरार पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘फसवणूक, बदनामी, गुन्हेगारी, तोतयागिरी करणे आणि लैंगिक कृत्ये असलेली सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे यासाठी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर टीम शामल क्रेडिट आणि न्यू क्रेडिट अशी लोन अॅप्स ट्रॅक करत आहे, जिथून दुबेने कर्ज घेतले होते. मे महिन्यापासून कुरार पोलिसांत दाखल झालेला असा हा सातवा गुन्हा आहे.