Mumbai Shocker: काळजी घ्या! घाटकोपरमध्ये नवविवाहित जोडप्याचा गिझर गॅस गळतीमुळे श्वास गुदमरून मृत्यू
ते जिथे जमिनीवर पडलेले आढळले त्या बाथरूममध्ये शॉवर चालू होता. अहवालात पोलीस सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत.
याआधी गिझर गॅस लिकेजमुळे (Gyser Gas Leakage) मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आताही मुंबईमधून (Mumbai) असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. घाटकोपर येथील एका नवविवाहित जोडप्याचा बुधवार, 8 मार्च रोजी कथित गिझर गॅस लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दीपक शाह (40) आणि टीना शाह (35) असे हे जोडपे घाटकोपरच्या कुकरेजा टॉवर्समध्ये भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते.
पंतनगर पोलिसांनी प्रथमदर्शनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, नातेवाइकांना हे जोडपे घरात निपचित पडलेले आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमध्ये काहीही संशयास्पद नसून, गिझरमुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
मिडडे मधील दुसर्या वृत्तानुसार, डीसीपी (झोन 7) पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले की, जोडप्याच्या घरात काहीही संशयास्पद नव्हते. ते जिथे जमिनीवर पडलेले आढळले त्या बाथरूममध्ये शॉवर चालू होता. अहवालात पोलीस सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. दीपकचा काही वर्षांपूर्वी व्यवसाय होता, परंतु सध्या तो बेरोजगार होता. (हेही वाचा: Holi 2023: पाण्याचा फुगा डोक्यात लागल्याने विलेपार्लेमध्ये 41 वर्षीय तरूणाचा मृत्यू)
माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दिवशी शाह यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले होते. बराच वेळ दरवाजा ठोठावला तरीही आतून काहीच आवाज आला नाही. त्यानंतर काही तरी गडबड झाल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी येऊन ड्युप्लिकेट चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला. त्यावेळी हे जोडपे जमिनीवर निर्जीव पडलेले आढळले.