Mumbai Shocker: महिलेच्या मृतदेहासोबत तब्बल 10 दिवस कुटुंब राहिले हॉटेलच्या खोलीत; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
त्यांनी शोध घेतला, परंतु काहीही सापडले नाही. त्यानंतर नसीमाचा मुलगा लंडनवरून परत आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
मुंबईमध्ये (Mumbai) साकीनाका (Sakinaka) येथील हॉटेलच्या खोलीत एका मृत महिलेचे कुटुंब तब्बल 10 दिवस तिच्या कुजलेल्या मृतदेहासोबत राहिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलेचा मुलगा लंडनवरून मुंबईला आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली व त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले. अहवालानुसार, अब्दुल करीम सुलेमान हलाई- 82, नसीमा युसूफ हलाई- 48, तिची 26 वर्षांची मुलगी आणि हलाईचा मुलगा आणि नातू यांनी 21 डिसेंबर 2023 रोजी हॉटेल ग्रॅन्डरमध्ये चेक इन केले.
त्यानंतर नसीमाला उलट्या आणि जुलाब सुरु झाले. तिचा आजार वाढला आणि नंतर तिचा मृत्यू झाला. नसीमा ही शिकवण्या घेत असे. जवळजवळ गेले पाच महिने ती आजारी होती. तिच्या मृत्यूच्या 15 ते 20 दिवस आधी तिला उलट्या आणि डिहायड्रेशनचा त्रास झाला.
नसीमाच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीने तिचा भाऊ यासीन लंडनहून परत येईपर्यंत अंतिम संस्कार पुढे ढकलण्याचा आग्रह धरला. ही मुलगी कायद्याची विद्यार्थिनी आहे. सध्या ती मानसिक समस्यांशी झुंजत असून तिच्यावर औषधोपचार सुरु आहे. मुलीने लंडनहून येणाऱ्या आपल्या भावाची वाट पाहण्याचा हट्ट धरला. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले नाही. कुटुंबाने इतर कोणालाही नसीमाच्या मृत्यूची माहिती दिली नाही, अगदी हॉटेल कर्मचारी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही नाही. ते सर्व वेळ दरवाजा बंद करून कुजलेल्या मृतदेहासोबत राहिले. (New Mumbai Shocking: BMC मध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार; अहमदनगर येथील आरोपीवर गन्हा दाखल)
जेव्हा मृतदेह कुजायला सुरुवात झाली तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना, उंदीर हा दुर्गंधीचा स्रोत असावा असे वाटले. त्यांनी शोध घेतला, परंतु काहीही सापडले नाही. त्यानंतर नसीमाचा मुलगा लंडनवरून परत आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्राथमिक तपासात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-मुलगी दोघेही पूर्वी जोगेश्वरी येथे राहत होते. मात्र नसीमाच्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर 21 महिन्यांपूर्वी ते घराबाहेर पडले होते. तेव्हापासून कुटुंबातील पाच जण शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहत होते.