Mumbai Shocker: चेंबूर येथे 13 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मित्राकडून महिनाभर बलात्कार; आरोपीला अटक, गुन्हा दाखल
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबईच्या (Mumbai) चेंबूर (Chembur) परिसरात राहत्या घरी एका 13 वर्षीय तरुणीवर तिच्या 19 वर्षीय मित्राने महिनाभर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. अहवालानुसार, मुलाने तिला ड्रग्ज देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. जेव्हा जेव्हा मुलगी घरी एकटी असायची तेव्हा हा मुलगा तिच्यावर बलात्कार करायचा. आरोपी मुलाला मुलीचे कुटुंबीय ओळखत होते, त्यामुळे मुलाचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. त्याचे मुलीच्या कुटुंबाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने कोणाला संशय येण्याचा प्रश्न नव्हता.

चेंबूर पोलिसांनी शनिवारी सांगितले की, मुलाने याच गोष्टीचा फायदा घेऊन मुलीवर बलात्कार केला तसेच त्यांच्या घरी चोरी देखील केली. साधारण 7 मे ते 6 जून या कालावधीत मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा मुलीचे आई-वडील वाहेर जायचे तेव्हा तेव्हा हा मुलगा त्यांच्या घरी जात असे. तो मुलीला दारू पाजायचा, ड्रग्ज द्यायचा आणि मुलीची शुद्ध हरपल्यावर तिच्यावर बलात्कार करायचा. कालांतराने घरातून सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम गायब झाल्याचे मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला चोरीबद्दल विचारले, तेव्हा तिने हा मुलगा आपल्या घरी वारंवार येत असल्याचे सांगितले.

त्यानंतर पालकांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला आणि 6 जूनच्या रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि या मुलाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने घरातील मौल्यवान वस्तू चोरल्याचे उघड झाले. (हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Nagar Crime: संभाजीनगरमध्ये व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर 6 जणांचा अत्याचार)

आता आरोपीवर कलम 376 (बलात्कार), 376 (2) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 420 (फसवणूक), 328 (गुन्हा करण्याच्या उद्देशाने दुखापत करणे), तसेच भारतीय दंड संहिता आणि कलम 4,  8 (लैंगिक अत्याचार) आणि 12 (लैंगिक छळ) लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.