मुंबईमधून (Mumbai) बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर आठ महिने बलात्कार केल्याप्रकरणी एका 50 वर्षीय व्यक्तीला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. दया शंकर जमीनदार राजभर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 18 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा उघडकीस आले, जेव्हा पीडितेचा शेजारी असलेल्या एका व्यक्तीने मुलुंडच्या एलबीएस रोडवरील सार्वजनिक शौचालयाजवळ मुलाला आरोपीसोबत पाहिले.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात शेजाऱ्याने उघड केले की, दोघांनी सार्वजनिक शौचालयात एकत्र येण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी अनेकदा त्याने आरोपी व पिडीत मुलाला शौचालयात जाताना पाहिले होते. शेजाऱ्याने आरोपीकडे याबाबत विचारणाही केली होती मात्र आपण केवळ शौचालयाचा वापर करण्यासाठी इथे येत असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र राजभरकडून मुलाचे लैंगिक शोषण होत असल्याचे पाहून शेजाऱ्याने त्यांचा पाठलाग करण्याचे ठरवले.
जेव्हा शेजाऱ्याने आरोपी हा पिडीत मुलाचे लैंगिक शोषण करत असल्याचे पाहिले तेव्हा त्याने तात्काळ मुलाची सुटका करून त्याच्या वडिलांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मुलाकडे राजभरबाबत विचारणा केली. त्यावेळी मुलाने सर्व प्रकार सांगितला. मुलाने दिलेल्या माहितीवरून त्याचे कुटुंब व शेजारी अशा सर्वांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. हा मुलगा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे.
मुलाने आपल्या जबानीत सांगितले की, राजभरने फेब्रुवारीमध्ये चॉकलेट आणि स्नॅक्स यांसारखे पदार्थ देऊन त्याच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर राजभरने त्याला वॉशरुममध्ये नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. कालांतराने, शोषण सुरू ठेवण्यासाठी राजभरने मुलाच्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलाने आतापर्यंत याबाबत कोणाला काही सांगितले नाही. एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी 19 सप्टेंबर रोजी राजभरला अटक केली. (हेही वाचा: Nagpur Shocker: नागपुरात 9 वर्षाच्या मुलीवर तिच्या लहान बहिणीसमोर बलात्कार; गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपयांचे आमिष, गुन्हा दाखल, तपास सुरु)
राजभरने गुन्ह्याची कबुली दिली असताना, चौकशीदरम्यान त्याने असामान्य वर्तन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजभर सध्या पोलीस कोठडीत आहे. भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यात नमूद केल्यानुसार, आरोपीवर लैंगिक छळ आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.