मुंबई: शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार; 22 वर्षीय तरूण अटकेत
या गोळीबारात शेखर जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रूग्णालयात उपचार सुरू आहे
मुंबई शहरामध्ये आज (19 डिसेंबर) सकाळी शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव (Shekhar Jadhav) यांच्या गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात शेखर जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेमध्ये एका 22 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. सकाळी वर्दळीच्या ठिकाणी अशाप्रकारे खुलेआम गोळीबार होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे.
विक्रोळीच्या टागोरनगर परिसरामध्ये साई मंदिर भागात सकाळी साडेसात आठच्या सुमारास हा गोळीबार झाला. जाधव यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे. हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकले नसले तरीही मीडीया रिपोर्ट्सनुसार मागील काही दिवसांपासून शेखर जाधव यांना धमकी येत होती. या प्रकरणी स्थानिक पोलिसांचा तपास सुरू आहे.
शेखर जाधव हे शिवसैनिक असून ते उपविभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला तरूण हा मूळचा प्रयागराज येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान मंगळवार रात्री उशिरा नागपूरमध्येही महापौर संदीप जोशी यांच्या कार वर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर काल यावरून विधिमंडळाच्या अधिवेशनातही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिल्याची भीती विरोधकांनी बोलून दाखवली आहे.