पीएमसी बँक खाते धारकांना मोठा दिलासा, आरबीआय संलग्न मालमत्ता लिलावासाठी काढणार

त्यामुळे नागरिकांना बँक खात्यामधील पैशांची चिंता सतावत असून गेल्या काही दिवसांपूर्वी दोन-तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकरणे समोर आली होती.

PMC Bank (Photo Credits: IANS)

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी हजारो नागरिकांचे पैसे या बँकेत अडकून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना बँक खात्यामधील पैशांची चिंता सतावत असून गेल्या काही दिवसांपूर्वी दोन-तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर आता पीएमसी बँक खाते धारकांना दिलासा मिळणार आहे. त्यानुसार आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाने मुंबई पोलिसांना जप्त केलेल्या संपत्तीची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यास सांगितली आहे. असे इकोनॉमिक्स टाईम्सच्या एका अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पीएमसी बँकेची संलग्न मालमत्ता सोडण्यास सांगितली आहे. तसेच संलग्न संपत्तीचा लिलाव लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे रिपोर्ट मधून सांगण्यात आले आहे. तर आरबीआयच्या या निर्णयामुळे आता पीएमसी बँक खाते धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय बँकेच्या या मागणीवर मुंबई पोलिसांना अशी अपेक्षा आहे की, कोर्टाने ही मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेकडे संलग्न असलेली संपत्ती आरबीआयच्या प्रशासकाकडे देण्यासाठी परवानगी द्यावी.(PMC Bank Crisis: मुंबई मध्ये पीएमसी बॅंक खातेदार पुन्हा आक्रमक; रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा)

बुधवारी बँक खाते धारकांनी त्यांची बँकेतील रक्कम लवकरात लवकर परत मिळावी यासाठी मुंबईत आंदोलन केले. याच आंदोलनानंतर खाते धारकांमध्ये काही वाद झाले. त्यापैकी तीन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेत घटनास्थळावरुन दूर नेले. अटक केलेल्या गुरज्योतसिंग कीर यांनी असे म्हटले की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याचा निर्णय घेतला असून आम्ही आंदोलने सुरुच ठेवणार आहोत. आतापर्यंत पीएमसी घोटाळाप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.