अकरावी प्रवेश प्रक्रियेत 95 टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे फक्त 20 टक्के विद्यार्थी पात्र

मात्र दरवर्षीप्रमाणेच यंदासुद्धा प्रवेशासाठी होणारा गोंधळ कायम असल्याचे दिसून येत आहे.

student filing form (Photo Credits: Independent)

अकरावी प्रवेश (FYJC) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षीप्रमाणेच यंदासुद्धा प्रवेशासाठी होणारा गोंधळ कायम असल्याचे दिसून येत आहे. तर 5 जुलै रोजी अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. परंतु त्यामध्ये शाळेअंतर्गत देण्यात येणारे 20 गुण बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जाहीर झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 95 टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे फक्त 20 टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 95 टक्क्यांवरील 1487 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामधील 1186 विद्यार्थी सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई मंडळाच्या विद्यार्थी आहेत. परंतु महाराष्ट्रातील फक्त 301 विद्यार्थी यासाठी पात्र ठरले आहेत. यामुळे अकरावीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्गही खडतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत 1 लाख 85 हजार 473 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.(हेही वाचा-अकारावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर)

तर एकूण सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वाणिज्य शाखेसाठी सार्वाधिक 1 लाख 17 हजार 275, विज्ञान शाखेसाठी 49 हजार 543, कला शाखेसाठी 17 हजार 301, तर एचएसव्हीसीसाठी 1 हजार 354 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.