CSMT स्टेशन बाहेरील 4 वर्षांपूर्वी कोसळलेला हिमालय पूल पुन्हा नव्या अंदाजात आजपासून लोकांच्या सेवेत

या पूलावर सध्या सामान्य जिना आहे. पण येत्या 6 महिन्यात यावर सरकता जिना देखील सुरू केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

CSMT | Twitter

सीएसएमटी (CSMT) हा सकाळ-संध्याकाळ मोठा गजबलेला भाग असतो. अशातच चार वर्षांपूर्वी एका संध्याकाळी स्टेशन परिसराजवळ असलेल्या हिमालय पूलाचा (Himalaya Bridge) काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेनंतर त्याजागी नवा पूल उभारण्यात आला. हा पूल आता मुंबईकरांसाठी आज (30 मार्च) पासून खुला करण्यात आला आहे.

स्टेशनवरून पलिकडच्या बाजूला जाण्यासाठी आता हा हिमालय पूल पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिने तांत्रिक कारणामुळे पुलाचे काम रखडले होते पण मार्चअखेरीस हा पूल सुरू झाला आहे. हा नवा पूल आराखड्यानुसार स्टेनलेस स्टीलचा वापर करून बनवण्यात आला आहे. मध्यंतरी कोरोना संकटाच्या काळात या पूलाचं काम रखडलं होतं.

2019 च्या 14 मार्चला हिमालय पूलावर दुर्घटना झाली होती. त्यामध्ये 7 जणांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेनंतर हा पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारण्यात आला आहे.

मुंबईत पोलादापासून तयार करण्यात आलेला हा पहिलाच पूल आहे. या पूलावर सध्या सामान्य जिना आहे. पण येत्या 6 महिन्यात यावर सरकता जिना देखील सुरू केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पूलासाठी 7 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

दरम्यान  या पूलाच्या  दुर्घटनेला जबाबदार ठरवण्यात आलेल्या ऑडिटर आणि 3 अभियंत्याना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ऑडिटर नीरज देसाई, कार्यकारी अभियंता अनिल पाटिल, सहाय्यक अभियंता संदीप काकुल्ले आणि मुख्य अभियंता (पुल विभाग) शीतल प्रसाद कोरी हे चौघे 9 महिन्यांनंतर तुरुगांबाहेर आले होते. 300 किलो इतके लोकांचे वजन पेलण्याची पुलाची क्षमता होती. मात्र, त्यावर खांब उभारल्याने 14,000 किलोग्रॅम इतक्या वजानाच अतिरीक्त भार पुलावर पडला. त्याचा परिणाम पुल कोसळण्यात झाला, असा दावा देसाई यांच्या वकीलांनी न्यायालयात केला होता.