सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील दुमजली उड्डाणपूलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास महापालिकेचा नकार
या जोडरस्त्याला भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आल्याचे कारण पुढे करीत दुमजली उड्डाणपुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देता येणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील दुमजली उड्डाणपूलाला (Santa Cruz Chembur Double Decker Flyover) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी मुंबई महापालिका प्रशासनाने (Mumbai Municipal Administration) फेटाळून लावली आहे.
या जोडरस्त्याला भाजप नेते गोपिनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे नाव देण्यात आल्याचे कारण पुढे करीत दुमजली उड्डाणपुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देता येणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या 9 ऑक्टोबर 2018 रोजी झालेल्या ठरावानुसार, या जोडरस्त्याचे ‘गोपिनाथ मुंडे सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोड’ असे नाव देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मिठी नदी ते चेंबूर जंक्शनदरम्यान सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता मुंबई महापालिकेच्या प्रमुख अभियंत्याकडे हस्तांतरित केला होता. (हेही वाचा - महाराष्ट्र राज्यात NPR बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावध भूमिका; महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थापन करणार समन्वय समिती)
दरम्यान, शिवसेना नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरील दुमजली उड्डाणपूलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी स्थापत्य समितीच्या अध्यक्षांना पत्र पाठवून केली होती. या पत्राला पालिका प्रशासनाने उत्तर दिले आहे. हा दुमजली उड्डाणपूल सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्त्याचाच भाग आहे. या रस्त्याला यापूर्वीच 'गोपिनाथ मुंडे' यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या दुमजली उड्डाणपुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देता येणार नाही, असे मुंबई पालिकेने म्हटले आहे. मात्र, जोगेश्वरी पूर्व-पश्चिम विभाग जोडणाऱ्या जोगेश्वरी दक्षिण उड्डाणपुलास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, असे मुंबई पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.