Mumbai MHADA House Scam: मुंबई मध्ये प्रभादेवी भागात म्हाडाचं घर मिळवून देण्याचं आमिष दाखवत 22 जणांची फसवणूक; कोट्यावधींचा गंडा

या प्रकरणी सुनील घाटवीसावे, त्याची पत्नी सुजाता, प्रशांत जाधव, बबिता भांगरे, रवी शिवगण आणि सरस्वती लोकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.

Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईकरांना म्हाडा घरांच्या सोडतीची (MHADA Housing Lottery) प्रतिक्षा आहे. येत्या काळात ती घोषित होईल असा अंदाजही काहीजणांनी व्यक्त केला आहे. पण नगारिकांच्या याच उत्सुकतेचा गैरफायदा घेत काही जण लोकांची फसवणूक करत असल्याचं देखील समोर आले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, प्रभादेवी (Prabhadevi) भागातील सेंच्युरी बाजार (Centuary Bazar) भागात म्हाडाचं घर मिळवून देण्याचं आमिष दाखवत 2 कोटीपेक्षा जास्त रूपये बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 21 जणांची फसवणूक झाली आहे. दादर पोलिस स्टेशन (Dadar Police Station) मध्ये 6 जणांविरूद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये काम करणार्‍या दत्तप्रसाद बाईत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुनील घाटवीसावे, त्याची पत्नी सुजाता, प्रशांत जाधव, बबिता भांगरे, रवी शिवगण आणि सरस्वती लोकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.

प्रभादेवीमधील सेंच्युरी बाजार म्हाडा कॉलनीतील म्हाडाच्या गिरणी कामगाराच्या सदनिका बाजार भावापेक्षा कमी किंमतीत मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आले होते. घाटविसावे यांच्यावर विश्वास ठेऊन बाईत आणि त्यांच्या नातेवाईकांसह अन्य 20 जणांनी सेंच्युरी बाजार म्हाडा कॉलनीतील सदनिका मिळवण्यासाठी एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत सुमारे 2 कोटी 30 लाखांचा व्यवहार केला.

आरोपीने म्हाडा कॉलनीतील म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या सदनिका दाखवल्या. त्यांना वांद्रे येथील म्हाडा ऑफिसमध्ये नेऊन त्यांचे बायोमेट्रिक्स घेतले. दरम्यान आर्थिक व्यवहार हे रोख आणि काही स्वरूपात चेकच्या माध्यमातून झाले आहेत.

प्राथमिक तपासामध्ये घटविसावे मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे, तर उर्वरित आरोपी हे लाभार्थी आहेत. त्यांच्या खात्यात फसवणुकीद्वारा गोळा केलेले हे पैसे जमा झालेले आहेत.