Mumbai Metro One Digital Pass WhatsApp: मुंबई मेट्रो १ चा डिजिटल पास आता व्हॉट्सअॅपवर, जाणून घ्या कसा खरेदी करायचा
मुंबई मेट्रो १ च्या व्हर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅपवर 'डीजी-पास' ही नवी डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली असून, आता प्रवासी घरबसल्या ट्रिप पास आणि स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करू शकणार आहेत.
मुंबई मेट्रो वनच्या व्हर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रो प्रवाशांना आता थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपला मेट्रो पास खरेदी आणि व्यवस्थापित करता येणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रमोटेड मुंबई मेट्रो वनने 'डीजी-पास' (DG-Pass) ही नवीन डिजिटल तिकीट सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची किंवा प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.
डिजिटल पासचे दोन मुख्य प्रकार
प्रवाशांच्या गरजेनुसार मुंबई मेट्रो वनने दोन प्रकारचे डिजिटल पास उपलब्ध करून दिले आहेत.
१. ट्रिप पास (Trip Pass): दररोज नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी हा पर्याय उपयुक्त आहे. यात प्रवासी एकाच वेळी निश्चित फेऱ्यांचे (Trips) आगाऊ पैसे भरून पास घेऊ शकतात. हे ट्रिप वापर होईपर्यंत व्हॉट्सअॅप पासमध्ये सुरक्षित राहतात.
२. स्टोअर व्हॅल्यू पास (Store Value Pass): हा पर्याय डिजिटल वॉलेटसारखा काम करतो. यामध्ये प्रवाशांना हवी ती रक्कम रिचार्ज स्वरूपात लोड करता येते. प्रत्येक प्रवासानंतर प्रवासाच्या अंतराचे भाडे या शिल्लक रकमेतून आपोआप वजा होते. रक्कम संपल्यावर ती पुन्हा डिजिटल पद्धतीने रिचार्ज करता येते.
हे दोन्ही पासेस गुगल वॉलेट आणि अॅपल वॉलेटमध्येही सेव्ह करण्याची सोय देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅपवरून डिजिटल पास मिळवण्याची प्रक्रिया
कोणतेही अतिरिक्त अॅप डाऊनलोड न करता किंवा नवीन खाते तयार न करता प्रवाशांना काही सोप्या टप्प्यांत हा पास मिळवता येईल.
सर्वप्रथम मुंबई मेट्रो वनच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर (+९१ ९६७०००८८८९) 'Hi' असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर चॅटमधील 'Book Now' पर्यायावर क्लिक करून 'Digital Pass' हा पर्याय निवडावा. पुढे आपल्या सोयीनुसार 'Trip Pass' किंवा 'Store Value Pass' निवडून यूपीआय, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरावे लागतील. व्यवहार पूर्ण होताच इलेक्ट्रॉनिक डिजिटल पास लगेच व्हॉट्सअॅपवर जारी केला जाईल.
कॅशलेस प्रवासाला मोठी गती
मुंबई मेट्रो वनने नोव्हेंबर २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपद्वारे सिंगल-जर्नी क्यूआर तिकीट देण्याची सुविधा सुरू केली होती. आता या सुविधेचा विस्तार करत नियमित प्रवाशांसाठी डिजिटल पास उपलब्ध करून दिला आहे. २०१४ पासून सुरू असलेल्या या ११.४ किलोमीटरच्या मेट्रो १ मार्गिकेवरून आतापर्यंत सव्वाशे कोटींहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. नव्या सुविधेमुळे मेट्रो स्थानकांवरील गर्दी आणि तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.