Mumbai-Madgaon Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 28 जूनपासून सुरू होणार; जाणून घ्या वेळा, थांबे आणि प्रवासाचा कालावधी

ही गाडी गोवा आणि महाराष्ट्रदरम्यान निसर्गरम्य प्रवासाचे आश्वासन देते.

Vande Bharat Trains (फोटो सौजन्य - PTI)

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस (Mumbai-Madgaon Vande Bharat Express) 28 जूनपासून नियमित सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ही गाडी लोकप्रिय पर्यटन स्थळ गोवा आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई अशा दोन शहरांदरम्यान जलद आणि सोयीस्कर रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ही ट्रेन 28 जूनपासून पावसाळ्यात आठवड्यातून तीन दिवस आणि 1 नोव्हेंबरपासून शुक्रवार वगळून आठवड्यातून सहा दिवस चालेल. ही एकूण आठ डब्यांची ट्रेन असेल. उद्घाटन झाल्यानंतर मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 27 जून रोजी गोव्याहून निघेल व 28 जूनपासून मुंबईमधून नियमित सेवा सुरू होईल.

वेळ-

ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून पावसाळ्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 5:25 वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता मडगावला पोहीचेल. परतीच्या दिशेने, गाडी क्रमांक 22230 मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12:20 वाजता मडगावहून सुटेल आणि रात्री 10:25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

पावसाळ्यानंतर ट्रेन क्रमांक  22229 सीएसएमटी मुंबईहून सकाळी 5.25 वाजता सुटेल आणि दुपारी 1.10 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 22230 मडगावहून दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि रात्री 10.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

प्रवासाचा कालावधी-

मडगाव आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सुमारे 586 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना सध्या सुमारे 11-12 तास प्रवास करावा लागतो. मात्र वंदे भारत ट्रेनमुळे पावसाळ्यात प्रवासाचा कालावधी अंदाजे दहा तासांचा असणे अपेक्षित आहे. त्यानंतर ही ट्रेन 586 किलोमीटरचे अंतर अवघ्या 7 तास 15 मिनिटांत पार करेल.

थांबे-

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबे असतील.

बुकिंग-

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे नियमित बुकिंग 26 जून रोजी सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांना या आधुनिक, सेमी-हाय-स्पीड ट्रेनमध्ये त्यांची जागा सुरक्षित करता येईल.  ही गाडी गोवा आणि महाराष्ट्रदरम्यान निसर्गरम्य प्रवासाचे आश्वासन देते. (हेही वाचा: आता बालाजीच्या दर्शनाला तिरुपतीला जाण्याची गरज नाही; प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये TTD उभारणार व्यंकटेश मंदिर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस यासह विविध शहरांसाठी पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनमुळे जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर प्रवास पर्यायांमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नवीन रोजगार आणि व्यवसायाच्या संधीही निर्माण होतील. वंदे भारत एक्सप्रेस ही स्वयं-चालित सेमी-हाय स्पीड ट्रेन सेट आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.