Mumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत
आज पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरील रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
मुंबई मध्ये काल रात्री पासून सतत कोसळलेल्या पावसामुळे सार्या शहरात पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबई लोकल देखील कोलमडली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज चर्चगेट ते अंधेरी (Churchgate - Andheri) या मार्गावरील सेवा विस्कळीत झाली होती, तर विरार (Virar) ते अंधेरी (Andheri) या मार्गावर धीम्या गतीने लोकल चालवली जात आहे. मात्र बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार आता पश्चिम रेल्वेसेवा हळूहळू मार्गावर येत आहे. मात्र मध्य आणि हार्बर या रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प आहे. दरम्यान रेल्वे रूळांवर आणि रस्त्यावरही पाणी साचल्याने नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना देण्यात आल्या आहे.
मुंबई शहरात सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने आता महानगरपालिकेकडून पंपिंग स्टेशन च्या माध्यमातून पाणी काढण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबईत आज सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा मध्ये 122.2 मिलीमीटर, सांताक्रूझ इथं 273.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पश्चिम रेल्वे ट्वीट
मध्य रेल्वे
पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वे मार्गावर सायन, कुर्ला परिसरामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने सायन, चुनाभट्टी कडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. सीएसएमटी- ठाणे, सीएसएमटी वाशी सेवा देखील ठप्प आहे. दरम्यान ठाणे-कल्याण आणि वाशी, पनवेल पलिकडे रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यासाठी खास शाटल सर्व्हिस सुरू आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या रिशेड्युल
मुंबईमधून आज सुटणार्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मुंबई-भुवनेश्वर स्पेशल ट्रेन 10 वाजता सुटेल. तर भुवनेश्वर- मुंबई, हावडा-मुंबई, हैदराबाद - मुंबई, गडाग- मुंबई या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल आहे.