मुंबई: ठाणे - मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने सध्या मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने चालवली जात आहे.
मुंबईमध्ये मध्य रेल्वेची सुविधा आज (13 सप्टेंबर) दिवशी सकाळी पुन्हा विस्कळीत झाली आहे. ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने सध्या मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने चालवली जात आहे. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने मुंबईमध्ये नोकरी धंद्यासाठी जाणारे. कॉलेजमध्ये जाणार्या अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. मध्य रेल्वेची मंदावलेली रेल्वे सेवा आणि सोबतीला आज सकाळपासून पुन्हा जोरदार बरसणारा पाऊस यामुळे मुंबईकरांच्या गैरसोयीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या काही स्थानकांमध्ये रूळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याच्या उद्घोषणा करण्यात आल्या आहे.
मुंबईच्या अनेक स्थानकांमध्ये रेल्वे प्रवासी लोकल ट्रेनच्या प्रतिक्षेत उभे आहेत. ठाणे स्थानकामध्येही प्लॅटफॉर्म क्रमांक 4 करून मुंबईच्या दिशेने धावणारी रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच सर्व लोकल गाड्या तात्पुरत्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 6 वरून रवाना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची जलद वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. मुंबई मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. मुंबई: सजग मुंबईकराच्या चलाखीने टळला मध्य रेल्वेवर कांजूरमार्ग ते भांडुप दरम्यान मोठा अपघात; छत्रीच्या मदतीने वाचवले हजारोंचे जीव
मध्य रेल्वेवर वरचेवर तांत्रिक बिघाड आणि रेल्वे सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवासी तक्रार करत असतात. अनेकदा आक्रमक होत प्रवाशांनी विविध स्थानकांवर आंदोलनं देखील केली आहेत.