Mumbai Local आणि Night Curfew याबाबत काय म्हणाले BMC आयुक्त इकबाल सिंह चहल? जाणून घ्या

मात्र अद्याप लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन नेमकी कधी सुरु होणार हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आहे.

BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) चा संसर्ग नियंत्रणात येत असून मिशन बिगेन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत अनेक सेवा सुविधा पुर्ववत करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप लोकल सेवा (Mumbai Local) सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन सुरु होण्यासाठी सर्वसामान्यांना अजून किती काळ प्रतिक्षा करावी लागणार? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. न्युज 18 लोकमतच्या वृत्तानुसार, यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी इतक्यात तरी लोकल सेवा सुरु होणार नसल्याचे सांगितले आहे. तसंच नवीन वर्षात लोकल सेवा सुरु करण्यासंबंधित निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, "सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी होत आहे. लोकलसेवा बंद असल्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयींची आम्हाला कल्पना आहे. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असली तरी संकट अद्याप टळलेले नाही. त्याचबरोबर लक्षणे नसतानाही कोविड असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यातच ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन नववर्षात लोकलसेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल."

त्याचबरोबर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकल सेवा पूर्ववत झाल्यास गर्दी वाढण्याचा अंदाज आहे. म्हणूनच तुर्तास लोकल सेवा सुरु करण्याच्या तयारीत नसल्याचे पालिका आयुक्तांनी म्हटले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला यांनाच ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. (Mumbai Local ट्रेन मध्ये महिला प्रवासांसोबत लहान मुलांना परवानगी नाही; रेल्वेस्थानकांत RPF जवान ठेवणार लक्ष)

तसंच मुंबईतील नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास नाईट कर्फ्यू करावा लागेल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "मुंबईत दोन ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत हजारो लोक मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले. त्यानंतर मी मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नागरिकांना 15 दिवसांचा अवधी देण्यात येत आहे. या काळात वर्तनात सुधारणा न दिसल्यास नाईलाजाने नाईट कर्फ्यू लागू करण्यात येईल."