Mumbai: पतीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला; फरार पत्नी व प्रियकराला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक
क्षुल्लक कारणावरून या जोडप्यामध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
मुंबईतील (Mumbai) साकीनाका (Sakinaka) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह घरातील बेडखाली आढळून आला आहे. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. महत्वाचे म्हणजे या तरुणाची पत्नी फरार होती, यामुळे या हत्येबद्दल पत्नीवर संशय होता. पत्नीला पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. आता या प्रकरणी 22 वर्षीय महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पतीच्या हत्येप्रकरणी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
घरात बेडखाली सापडलेल्या मृताचे नाव नसीम खान (23) असे आहे. नसीम खान हा व्यवसायाने टेलर होता. व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना सोमवारी नसीमचा कुजलेला मृतदेह खैरानी रोड भागात त्याच्या भाड्याच्या घरात बेडच्या स्टोरेज कंपार्टमेंटमध्ये सापडला होता. यावेळी त्याची पत्नी रुबिना गायब होती.
त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि इतर ठिकाणे तपासून रुबीना आणि तिचा प्रियकर सैफ जुल्फिकार फारुकी यांना पकडण्यात आले. क्षुल्लक कारणावरून या जोडप्यामध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे तपासात समोर आले आहे. 14 जुलै रोजी नसीमच्या वडिलांनी त्याला फोनवर कॉल केला, परंतु रुबिनाने तो आजारी असल्याचे सांगत फोन स्वतःकडेच ठेवला. (हेही वाचा: 26 वर्ष शेजारी राहणार्या महिलेवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग सह लैंगिक छळ करणार्या 65 वर्षीय पुरूषाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या)
दुसऱ्या दिवशीही नसीमच्या वडिलांनी त्याला कॉल केला होता, मात्र त्याचा फोन बंद होता. त्यानंतर नसीमच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते त्याच्या घरी पोहोचले, मात्र दरवाजा बंद होता. या दरम्यान शेजाऱ्यांनी परिसरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केल्यावर पीडितेचा मृतदेह सापडला. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा गायब करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.