Mumbai: मुंबईमधील 250 वर्षे जुन्या श्री विठोबा मंदिराच्या तिजोरीतून लाखो रुपयांचे दागिने गायब; FIR दाखल, पोलीस तपासणार 1990 ते 2018 पर्यंतचे सर्व रेकॉर्ड

त्यानंतर ट्रस्टींनाही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे व त्यानुसार अटक करण्यात येईल.

Jewellery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबईच्या (Mumbai) काळबादेवी परिसरात असलेल्या श्री विठोबा मंदिर ट्रस्टच्या (Shri Vithoba Temple Trust) तिजोरीतून लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. आरोप आहे की, ट्रस्टच्या व्यवस्थापकाने ट्रस्टच्या लॉकरमधून 13.45 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने कथितपणे गायब केले. त्यानंतर आता एलटी मार्ग पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला आहे.

सार्वजनिक ट्रस्ट म्हणून ओळखले जाणारे 'श्री विठोबा मंदिर ट्रस्ट'ची स्थापना 1953 मध्ये झाली होती. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर 250 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

अहवालानुसार, 1953 मध्ये ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर, प्रत्येक टर्मवर किमान 3-7 विश्वस्त होते. आता तक्रारदार, सरयू कपाडिया, 59, यांनी आरोप केला आहे की 1990-2018 च्या दरम्यान कुठेतरी ट्रस्टींपैकी एक असलेल्या व्यक्तीने ट्रस्टच्या लॉकरमधून दागिने गायब केले व पसार झाला. कपाडिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, 1997-1995 मध्ये ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी मनोहर गोगटे नावाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती.

या काळात गोगटे यांच्याकडे तिजोरी, दानपेटी (दान पेटी) आणि बँकेच्या लॉकरच्या चाव्या सांभाळण्याची जबाबदारी होती, जी त्यांनी कोणालाही देण्यास नकार दिला. गोगटे यांच्या निधनानंतर जयंत देसाई नावाच्या व्यक्तीने ट्रस्टचे अध्यक्षपद स्वीकारले. पुढे 2018 मध्ये, महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त (वरळी) यांनी देसाई यांना पत्र पाठवून लॉकरमधील सर्व मौल्यवान वस्तू तपासणीच्या उद्देशाने बाहेर काढण्यास सांगितले.

त्यानंतर देसाई यांनी तातडीची बैठक बोलावून सर्व संबंधितांना गोगटे यांच्या मृत्यूनंतर किल्ली हरवल्याची माहिती दिली होती. मोठ्या चर्चेनंतर लॉकर उघडण्यासाठी डुप्लिकेट चावी तयार करण्यात आली. लॉकरमध्ये मूळतः 55 दागिन्यांच्या वस्तू होत्या पण उघडल्यावर त्यातील 8 गायब असल्याच्या आढळल्या.

याबाबत देसाई यांनी जुलै 2018 मध्ये एलटी मार्ग पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती परंतु त्याचे एफआयआरमध्ये रूपांतर झाले नाही. सोमवारी दुपारी, भारतीय दंड संहितेच्या कलम 406 (विश्वासाचे गुन्हेगारी उल्लंघन) च्या आरोपासाठी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला. (हेही वाचा: Lalbaugcha Raja First Look 2023 Date: लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन कधी? तारीख घ्या जाणून)

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ते आता 1990 ते 2018 पर्यंतचे सर्व रेकॉर्ड आणि कागदपत्रे तपासण्यासाठी खोदून काढतील. त्यानंतर ट्रस्टींनाही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे व त्यानुसार अटक करण्यात येईल.