Mumbai: धावत्या ट्रेनमधून पतीने पत्नीला ढकलले; महिन्याभरापूर्वीच झाले होते लग्न

रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकात ही घटना घडली. यात महिलेचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या महिलेने पोलिसांना याची माहिती दिली.

Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

धावत्या लोकलमधून पतीने पत्नीला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. रेल्वेच्या हार्बर मार्गावरील (Harbour Line) गोवंडी (Govandi) परिसरात ही घटना घडली. यात महिलेचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या महिलेने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अन्वर अली असं या आरोपीचं नाव असून अवघ्या महिनाभरापूर्वीचे त्याचे लग्न झाले होते. (राजस्थान: धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन तरुणाने होणाऱ्या बायकोला शेतात बोलावून तिची कुऱ्हाडीने केली हत्या)

पूनम चव्हाण असं मृत महिलेचे नाव होते. दरम्यान, हे दोघेही बेरोजगार असून लहान सहान कामे करुन आपला उदरनिर्वाह चालवत असतं. पूनमचे हे दुसरे लग्न असून तिला पहिल्या नवऱ्यापासून तीन वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर ते दोघेही मानखुर्द येथील एका चाळीस राहायला होते. (ठाणे: कळवा-मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडले तीन प्रवासी, एकाचा मृत्यू)

सोमवार, 11 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास पूनम आणि अन्वर लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी पूनम दरवाज्याजवळ असलेल्या खांबाला पकडून उभी होती. काही वेळाने पती अन्वर तिच्याजवळ आला आणि त्याने तिला पाठीमागून मिठी मारली. त्यामुळे ती खांबाला असलेला हात सोडून तशीच दारात उभी राहिली. परंतु, काही वेळातच अन्वरने तिला सोडून दिले आणि ती खाली कोसळली. पूनम खाली पडल्यानंतरही त्याची काहीच प्रतिक्रीया नव्हती. त्यामुळे ही घटना पाहणाऱ्या महिलेला शंका आली आणि तिने सर्व प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी अन्वरला अटक केली आहे.

दरम्यान, रागातून किंवा इतर कोणत्या कारणाने अन्वरने पूनमचा घात केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चौकशीतून याचा खुलासा होईल.