Goregaon Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांची 1.33 कोटींची फसवणूक; मुंबई येथील गोरेगाव परिसरातील घटना

मुंबई येथील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याला 'डिजिटल अटक' घोटाळ्यात सायबर गुन्हेगारांकडून ₹1.33 कोटींचे नुकसान झाले. फसवणूक कशी झाली आणि तुम्ही कोणती खबरदारी घेऊ शकता, याबाबत घ्या जाणून.

Digital Arrest | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

मुंबई येथील गोरेगाव (Goregaon Digital Arrest Scam) परिसरातील सेवानिवृत्त सरकारी बँक कर्मचारी असलेल्या एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याला (Senior Citizens Duped) 10 दिवसात 1.33 कोटी रुपये गमवावे लागले आहेत. हे नुकसान त्यांना कोणत्या व्यवसाय अथवा खर्चामुळे नव्हे तर चक्क 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) घोटाळ्याचा बळी ठरल्याने झाले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना आपल्या सापळ्यात अडकवून त्यांची सायबर फसवणूक (Cybercrime News) केली. गुन्हेगारांनी या जोडप्यास आपण केंद्रीय तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाचा भाग असल्याचे भासवले आणि त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाचे खोटे आरोप केले. त्यासाठी एक तोतया प्रकरण निर्माण करुन नाट्य रचले आणि या जोडप्याला त्यांच्या कुटुंबापासून वेगळे केले. तब्ब्ल 10 दिवस डिजिटल अटकेत राहिल्यानंतर या जोडप्याने त्यांची सेवानिवृत्ती आणि स्वेच्छानिवृत्तीतून आलेली आयुष्यभराची सर्व बचत आणि आर्थिक जमापूंजी गमावली.

आरबीआय अधिकारी असल्याचे भासवून दबाव

या घोटाळ्याची सुरुवात नोव्हेंबरच्या सुरुवातीला झाली. जेव्हा दोन्ही सेवानिवृत्त सरकारी बँक कर्मचारी असलेल्या या जोडप्यावर 500 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडलेल्या या महिलेला आरबीआयच्या एका कथित अधिकाऱ्याने फोन करून लक्ष्य केले होते. फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर बँक फसवणुकीचा आरोप केला आणि चौकशीच्या नावाखाली तिची बचत "सुरक्षित खात्यांमध्ये" हस्तांतरित करण्यास भाग पाडले. आरोपींनी या जोडप्यावर इतका दबाव टाकला की, त्यांच्यातला संभ्रम वाढत गेला आणि स्वत:वरचे नियंत्रण गमावून त्यांनी आरोपींच्या सूचनांना प्रतिसाद देणे सुरु केले. (हेही वाचा, How to Protect Yourself from Cyber Fraud: सायबर फसवणूक आणि गुन्हेगारांपासून कसे कराल स्वतःचे संरक्षण? जाणून घ्या खास टीप्स)

10 दिवस अलगीकरण आणि फसवणूक

अज्ञात आरोपींनी या जोडप्याला 11 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत 'डिजिटल अटक' केली. या काळात महिलेला सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले गेले. घोटाळेबाजांनी तिच्यावर 35 लाख रुपयांची मुदत ठेवी फेडण्यासाठी दबाव आणला, ज्यामुळे तिचा संशय वाढला. दरम्यान, एका वृत्तपत्रात तिला सायबर घोटाळा आणि फसवणूक प्रकरणाशी एक लेख मिळाला. ज्यामध्ये अशा प्रकरण आणि घटनांपासून स्वत:ला कसे सुरक्षीत करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. पीडितेने तातडीने 1930 च्या सायबर क्राईम हेल्पलाईन आणि मुंबई पोलिसांच्या उत्तर सायबर सेलशी संपर्क साधला. ज्यामुळे तिला तातडीने मदत मिळू शकली. (हेही वाचा, Mumbai Tops Cybercrime Complaints: सायबर क्राईम घटनांमध्ये मुंबई अव्वल; जाणून घ्या तक्रारींची संख्या आणि पोलीस कारवाई)

तपासात मोडस ऑपरेन्डी उघडकीस आली

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्ण शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळेबाजांनी फसवणूक करताना बनावट बँक नोटीसचा वापर केला. त्यासाठी हैदराबादच्या पोलीस अधिकाऱ्याची वेशभूषा केली आणि महिलेकडे तिचे पैसे हस्तांतरित करण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतरही, फसवणूक करणाऱ्यांनी तिची विधाने अविश्वसनीय असल्याचा दावा केला आणि तिचे पालन करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फसवणूक करणारे खोटे आरोप करून आणि सरकारी कार्यालयांसारखी बनावट व्यवस्था वापरून पीडितांच्या भीतीचा गैरफायदा घेतात. पीडितांना तपासाच्या बहाण्याने वेगळे केले जाते आणि त्यांच्यावर अथक दबाव आणला जातो.

'डिजिटल अरेस्ट' म्हणजे काय?

  • 'डिजिटल अटक' हा शब्द अशा घोटाळ्याचा संदर्भ देतो जिथे सायबर गुन्हेगार कायद्याची अंमलबजावणी किंवा वित्तीय संस्थांची वेशभूषा करून पीडितांवर मनी लॉन्ड्रिंग किंवा फसवणूक यासारख्या गुन्ह्यांचा आरोप करतात. ते व्हिडिओ कॉलद्वारे पीडितांवर सतत पाळत ठेवतात आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी पैशांची मागणी करतात.
  • मुंबई सायबर सेलच्या अहवालानुसार अशा प्रकरणांमध्ये तीव्र वाढ दिसून येते, एकट्या 2024 मध्ये 102 घटना नोंदवल्या गेल्या, ज्यात ₹90 कोटींहून अधिक रक्कम गुंतलेली आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

तज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की ज्येष्ठ नागरिक, जे अनेकदा कुटुंबापासून अलिप्त असतात किंवा ऑनलाइन जास्त वेळ घालवतात, ते अशा घोटाळ्यांमुळे विशेषतः असुरक्षित असतात. त्यांच्या कुटुंबावर ताण येईल या भीतीने अनेकजण गुन्ह्यांची तक्रार करण्यास संकोच करतात. या प्रकरणात, पोलिसांशी संपर्क साधण्याच्या तक्रारदाराच्या धाडसामुळे फसवणूक उघडकीस येण्यास मदत झाली, परंतु अधिकारी वृद्धांमध्ये जागृतीचे महत्त्व अधोरेखित करतात.

डिजिटल अरेस्ट, सायबर फसवणूक कशी टाळाल?

  • सतर्क राहाः अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या अज्ञात नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सावध रहा.
  • संशयास्पद कृतीचा अहवाल द्याः 1930 हेल्पलाईन किंवा National Cybercrime Reporting Portal at Cybercrime.gov.in चा वापर करा.
  • जलद कृती कराः निधी वसूल होण्याच्या अधिक चांगल्या शक्यतांसाठी "सुवर्णकाळ" (Golden Hours) आत घडणाऱ्या घटनांचा अहवाल द्या.

दरम्यान, गोरेगाव 'डिजिटल अटक' घोटाळ्यामुळे सायबर फसवणुकीबाबत जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या डावपेचांबद्दल त्यांच्या कुटुंबियांना शिक्षित करण्याचे आवाहन केले आहे. अशा घटनांची त्वरित तक्रार करण्याचे जनतेला आवाहन करत मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now