अंजनारी पूलावरून टॅंकर कोसळल्यानंतर 36 तास ठप्प असलेला मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा वाहतूकीसाठी सुरू

त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता.

Lpg Tanker Accident Anjanari bridge | (Photo Credit - Twitter)Mumbai Goa Highway traffic disrupted

मुंबई-गोवा हायवे (Mumbai-Goa Highway) वर लांजा (Lanja) जवळ असलेला अंजनारी पूलावरून (Anjanari Bridge) एक टॅंकर कोसळला आणि हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान गॅसने भरलेला टॅंकर कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पण आता 36 तासाने हा पूल पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मध्यरात्री अडीज वाजल्यापासून हा पूल पुन्हा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणार्‍यांना आता दिलासा मिळाला आहे. मागील 36 तास अंजनारी पूल बंद करून प्रवाशांना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागत होती.

अपघातग्रस्त टॅंकर मध्ये एलपीजी गॅस भरलेला होता. 18 मॅट्रिक टन गॅस भरलेला टॅंकर कोसळल्याने पहिल्यांदा सुरक्षेच्या कारणास्तव तो रहदारीसाठी बंद करण्यात आला. नदीत कोसळलेल्या टॅंकर मधून गॅस गळती होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. टॅंकरमध्ये भरलेला गॅस दुसर्‍या टॅंकर मध्ये भरण्यासाठी काल (23 सप्टेंबर) एक पथक तैनात करण्यात आले होते. अपघातग्रस्त टॅंकर मधून गॅस दुसर्‍या टॅंकर मध्ये भरण्यात यश आलं आहे. यासाठी उरण आणि गोवा मधून तज्ञांनी टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांच्या देखरेखीखाली गॅस दुसर्‍या टॅंकर मध्ये भरण्याचे काम पूर्ण झाले.

भरधाव वेगात असलेला हा टँकर गुरूवारी अंजनारी पुलाचा कठडा तोडून लांजा जवळ असलेल्या काजळी नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.