Mumbai Ganesha Idol Immersion: यंदा आरे कॉलनीमध्ये होणार नाही गणपती मूर्तीचे विसर्जन; पर्यावरणवाद्यांनी घेतली कठोर भूमिका

आम्ही बीएमसीला आधीच स्पष्ट केले आहे, आम्ही आरे तलावात मूर्ती विसर्जनाला परवानगी देऊ शकत नाही.’

Lord Ganesh (PC - Twitter)

आरे दूध वसाहतीने (Aarey Milk Colony) यंदा प्रथमच आरे तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जनावर (Ganesha Idol Immersion) बंदी घातली आहे. गोरेगाव, जोगेश्वरी आणि बोरीवली येथील सुमारे 1,000 घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे दरवर्षी आरे तलावात विसर्जन केले जाते. यावर्षी, शहरातील पर्यावरणवाद्यांनी आरे मधील विसर्जनाबाबत ठोस भूमिका घेतली आहे. मिरवणुकांमधील लाऊडस्पीकरमुळे केवळ नैसर्गिक संसाधने प्रदूषित होत नाहीत तर, अशा गोष्टी वन्यजीवांसाठीदेखील हानिकारक ठरू शकतात, असे नमूद करून आरेच्या पाणवठ्यांमध्ये मूर्ती विसर्जनास विरोध केला गेला आहे.

एनजीओ वनशक्तीच्या संचालकांनी आरे मिल्क कॉलनीला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ‘संपूर्ण आरे मिल्क कॉलनी परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील झोन (ESZ) मध्ये येतो आणि इथे सर्व क्रियाकलाप नियंत्रित किंवा प्रतिबंधित आहेत. आरेमधील तलाव आणि जलकुंभांमध्ये दरवर्षी होणाऱ्या प्रदूषणाबद्दल आम्ही चिंतित आहोत. छोटा काश्मीर तलाव, पिकनिक पॉइंट तलाव आणि पिकनिक पॉइंट गार्डनच्या मागे असलेले छोटे तलाव हे सर्व ESZ अंतर्गत बारमाही नैसर्गिक जलसाठे आहेत.’

पत्रात पुढे लिहिले आहे, ‘गणेशोत्सव काळात शहराच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मूर्ती इथल्या पाणवठ्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि मूर्तींमध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगांमुळे तलाव प्रदूषित होत आहेत. हे पाणवठ्यांमधील जलचरांसाठी हानिकारक आहे.’ अशा प्रकारे आरेमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्यास बंदी घातल्याने आता बृहन्मुंबई महानगरपालिकेसमोर (BMC) पर्यायी व्यवस्था करण्याचे आव्हान आहे. (हेही वाचा: Shrimant Dagdusheth Ganpati यंदा अनंत चतुर्दशी दिवशी दुपारी 4 वाजताच मार्गस्थ होणार)

आरे मिल्क कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाकचौरे म्हणाले, ‘सरकारी अधिसूचनेनुसार, आरे डेअरी फार्मचा संपूर्ण परिसर ESZ म्हणून घोषित करण्यात आला आहे. आम्ही बीएमसीला आधीच स्पष्ट केले आहे, आम्ही आरे तलावात मूर्ती विसर्जनाला परवानगी देऊ शकत नाही.’ माहितीनुसार, बीएमसी पर्यायी व्यवस्था म्हणून आरे कॉलनीबाहेर एक कृत्रिम तलाव तयार करणार आहे, जिथे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करता येईल. सार्वजनिक गणेशमूर्तींसाठी पर्यायी व्यवस्था करणे ही बीएमसीसमोर सर्वात मोठी समस्या असेल. नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले की सार्वजनिक गणेश मंडळांनी आता मालाड, जुहू बीच किंवा मार्वे येथे विसर्जन करणे आवश्यक आहे.