मुंबई: 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक

संबंधित महिलेसोबत तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

गुटख्याची तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकाकडून 5 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी एका महिलेला विक्रोली (Vikroli) पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेसोबत तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही पोलीस अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी टेम्पो चालकाला धमकवण्यास सुरुवात केली. विक्रोळी पोलिसांना यासंदर्भात माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक म्हणजे, आरोपी महिला एका माजी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का लागला आहे.

भारती चौधरी असे या महिलेचे नाव असून त्या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नी आहेत. भारती चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी चित्रा वाघ यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भारती चौधरी यांनी गुटखा घेऊन जात असलेला टेम्पो विक्रोळी येथे गोदरेज कंपनीसमोर अडवला. तसेच त्या स्वत: पोलीस अधिकारी असल्याचे भासवत भारतीसोबत असलेल्या तरुणाने टेम्पो चालकाला धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्या मालकाकडून 5 लाख रुपये मागवून घे, असे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी भारती चौधरी आणि तिच्यासोबत असलेल्या चंदन यादव या युवकास अटक केली आहे. हे देखील वाचा- ठाणे: राम मंदिरात चोरी; सव्वा लाखाच्या दागिने, रोकड गायब

पूर्व विभागाच्या पोलीस अतिरिक्त आयुक्त लक्ष्मी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 385, 341, 170 आणि 34 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.