मुंबईतील धारावीत आज नव्याने 17 कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 2 हजारांच्या पार, मुंबई महापालिकेची माहिती
त्यामुळे आकडा 2 हजारांच्या पार गेल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावीच. पण आता घराबाहेर पडत असताना सुद्धा योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) आज नव्याने 17 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आकडा 2 हजारांच्या पार गेल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
धारावीत गेल्या काही दिवसांपासून नव्याने एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली नाही. तसेच येथील परिस्थिती हळूहळू बदलत चालल्याचे ही दिसून येत आहे. धारावीत आतापर्यंत 2030 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या असून 77 जणांचा बळी गेल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. धारावीत दाटीवाटीने लोकवस्ती असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे शक्य नाही आहे. मात्र महापालिकेकडून या ठिकाणच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या एका पथकाने येथील स्थानिकांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी सुद्धा केली होती.(महाराष्ट्र: COVID19 च्या चाचणीसाठी नागरिकांना आता 4400 रुपयांऐवजी 2200 रुपये मोजावे लागणार, राज्य सरकारचा निर्णय)
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 101141 वर पोहचला असून 3717 जणांचा बळी गेला आहे. राज्यातील पुण्याच्या पाठोपाठ मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.