Mumbai Dahi Handi 2026: मालाडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट; भिंतीचा कॉलम कोसळून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडी फोडताना विटांचा कॉलम कोसळल्याने 7 वर्षीय रुद्र कदम या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीस आणि पालिका यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील मालाड पश्चिम भागातील मालवणी परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करताना घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान विटांचा कॉलम कोसळून त्याखाली सापडल्याने या मुलाला जीव गमवावा लागला. राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान पुण्यातही दहीहंडीनंतर मंडप उतरवताना लोखंडी रॉड डोक्यात पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मालाडमध्ये दहीहंडी उत्सवात काय घडलं?
शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चिकुवाडी, मालवणी, मार्वे रोड येथील एकता वेल्फेअर सोसायटीत रूम क्रमांक 23 जवळ स्थानिक स्तरावर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी काही मुले स्वतःहून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होती. दहीहंडी बांधण्यासाठी दोरी एका झाडाला आणि तळमजल्यावरील बांधकामातील विटांच्या कॉलमला बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान हा विटांचा कॉलम अचानक कोसळला.
मुलाचा जागीच मृत्यू, उपचारादरम्यान डॉक्टरांची पुष्टी
कोसळलेल्या कॉलमखाली रुद्र कदम हा 7 वर्षांचा मुलगा अडकला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तातडीने त्याला मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कंट्रोल रूम, पालिका कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या प्रकरणी पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
मालाडच्या या घटनेमुळे दहीहंडी उत्सवादरम्यान पाळल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. असुरक्षित संरचना किंवा बांधकामाचा आधार घेऊन दोरी बांधण्यासारख्या पद्धती किती धोकादायक ठरू शकतात, हे या घटनेतून समोर आले आहे. स्थानिक पातळीवर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या धोक्यांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरारसह अनेक भागांत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ढोल-ताशांच्या गजरात आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी थरावर थर रचत गोविंदा पथके सहभागी होतात. यंदाही राज्यातील अनेक भागांत 9 ते 10 थरांची सलामी देण्यात आली. मात्र मालवणीतील ही घटना उत्सवाच्या आनंदावर विरजण घालणारी ठरली असून, यानिमित्ताने सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.