Mumbai: सायबर गुन्हेगार टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश; 12 वी पास मास्टरमाईंडने दिवसाला केली 5 कोटींहून अधिक कमाई

या पद्धतीचा वापर करून सायबर टोळीने देशभरातील हजारो लोकांना लक्ष्य केले.

Representational Image (Photo Credit: PTI)

पोलीस कर्मचारी असल्याचे भासवून लोकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Thief) टोळीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. महत्वाचे म्हणजे याचा मास्टरमाईंड अवघा 12 वी शिकलेला असून त्याने दिवसाला 5 कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार केले आहेत. या सायबर गुन्हेगारालाही अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली. मास्टरमाइंड श्रीनिवास राव दादी (49), ज्याचे शिक्षण जरी मर्यादित झाले असले तरी त्याला चांगले तांत्रिक ज्ञान आहे, त्याच्याच जोरावर त्याने इतकी मोठी फसवणूक केली.

याला बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या पथकाने हैदराबादमधील एका आलिशान हॉटेलमधून ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्याने सांगितले. दादी व्यतिरिक्त, पोलिसांनी त्याच्या टोळीतील आणखी चार सदस्यांना अटक केली, ज्यात ठाण्यातील दोन आणि कोलकाता येथील काही जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आतापर्यंत दादीने वापरलेली 40 बँक खाती गोठवली आहेत आणि त्यांच्याकडून 1.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

माहितीनुसार, फसवणूक करण्यासाठी दादीने रिअल इस्टेटचा व्यवसाय चालवण्याचे नाटक केले. तो आपला व्यवसाय केवळ टेलिग्राम अॅपद्वारेच चालवत होता. मात्र याच्या आडून त्याचा खरा व्यवसाय चालायचा. या व्यवसायाच्या कार्य प्रणालीबद्दल स्पष्टीकरण देताना अधिकाऱ्याने सांगितले की, दादी आणि त्याचे साथीदार लोकांना, बहुतेक महिलांना, पोलीस अधिकारी म्हणून कॉल करायचे आणि सांगायचे त्यांनी पाठवलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज किंवा शस्त्रे सापडली आहेत. ही गोष्ट ऐकल्यावर समोरील व्यक्ती नक्कीच घाबरून जायची.

याचाच फायदा घेत त्या व्यक्तीने ते कुरिअर पाठवले आहे की नाही हे तपासण्याची गरज असल्याचे सांगून दादी कॉलरच्या बँक किंवा आयकर-संबंधित तपशीलांची मागणी करायचा. घाबरलेले बहुतेक लोक त्यांचे बँक किंवा आयटी तपशील शेअर करायचे. त्यानंतर हे लोक त्यांच्या फोनवरील वन टाइम पासवर्ड (OTP) देखील शेअर करायचे. त्यानंतर दादी आणि त्याचे साथीदार लोकांच्या खात्यातून पैसे चोरायचे.

काही प्रकरणांमध्ये लोकांना AnyDesk सारखे अॅप डाउनलोड करायला भाग पाडून, त्यांच्या मोबाईल फोनवरील नियंत्रण घेऊन फसवण्यात आले. या पद्धतीचा वापर करून सायबर टोळीने देशभरातील हजारो लोकांना लक्ष्य केले. टोळीने चोरलेले सर्व पैसे दादी व्यवस्थापित बँक खात्यात जमा करत असे. (हेही वाचा: Mumbai: अवघ्या 5,000 रुपयांच्या भांडणातून बॉसची हत्या करून कर्मचारी फरार; तब्बल 13 वर्षांनंतर पोलिसांनी घेतले ताब्यात)

या खात्यांमध्ये दिवसाला 5 कोटी ते 10 कोटी रुपयांचे व्यवहार होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर दादी पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करायचा आणि चिनी नागरिकाकडे हस्तांतरित करत असे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी शहर पोलिसांची पथके दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी आहेत चौकशी करत आहेत. या प्रकरणामध्ये आणखी अटक होण्याची शक्यता आहे.