Mumbai CSMT–Madgaon Vande Bharat Express आता 1 नोव्हेंबरपासून सहा दिवस धावणार
शुक्रवारी देखभाल, दुरूस्तीसाठी ही ट्रेन ऑफ ट्रॅक असेल.
येत्या सुट्टीच्या दिवसात कोकण, गोव्याला जाणार्यांसाठी खूषखबर आहे. कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर आता 1 नोव्हेंबर पासून गैर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. तसेच सीएसएमटी-मडगाव- सीएसएमटी ही वंदे भारत (Mumbai CSMT–Madgaon Vande Bharat Express) ट्रेन शुक्रवार वगळता आता रोज धावणार आहे. पावासाळ्याच्या दिवसात कमी केलेला ट्रेनचा वेग आता वाढवला जाणार असल्याने प्रवास पुन्हा वेगवान होणार आहे. राजधानी सह आता 88 गाड्यांचा वेग वाढवला जाणार आहे.
महाराष्ट्रातून मान्सून परतल्यानंतर आता 1 नोव्हेंबर पासून पुन्हा कोकण रेल्वेवर गैर पावसाळी वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. सध्या कोकणात वेगावान धावणार्या एकमेव वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांची चांगली पसंती आहे. आधी आठवड्यातून 3 दिवस धावणारी वंदे भारत 1 नोव्हेंबर पासून 6 दिवस धावणार आहे. शुक्रवारी देखभाल, दुरूस्तीसाठी ही ट्रेन ऑफ ट्रॅक असेल. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणात आणि गोव्यात जाणार्यांना फायदा होणार आहे.
कोकणात धावणार्या रेल्वे मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळण्याची भीती असते. कोकणात बेसुमार पाऊस पडत असल्याने अप्रिय घटना, अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यात कोकण रेल्वे ताशी 75 किमी या वेगमर्यादेमध्ये धावते तर गैर पावसाळी वेळापत्रकात आता मुंबई गोवा मार्गावर काही ठिकाणी रेल्वे गाड्या 100 -120 ताशी किमीच्या वेगाने धावण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो तुमच्या रेल्वेगाडीचा वेग वाढणार का, याप्रश्नाच्या माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES मोबाइल अॅप डाऊनलोड करा, असे आवाहन मध्य-कोकण रेल्वेने केले आहे.