Mumbai Crime: खंडणीसाठी बिझनेस पार्टनरनेच केले होते हॉटेल मालकाचे अपहरण, पोलिसांकडून सुखरुप सुटका

अपहरणकर्ते ठाण्यातील शहापूरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर शहापूरच्या दिशेने पोलिसांची पथके रवाना झाली.

Andheri Kidnap Case

मुंबईत काल अंधेरी परिसरात गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या 13 तासाच्या आत पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हॉटेल व्यवसायिकाची सुखरुप सुटका केली आहे. अनुप शेट्टी असे या हॉटेल व्यवसायिकाचे नाव असून पोलिसांनी शहापूर इथून त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

अंधेरी-कुर्ला रोडवर वीरा रेसिडेन्सी नावाचे हॉटेल अनुप शेट्टी यांचे आहे. यात विजय ओखीरकर (वय 42 वर्षे) हा त्यांचा व्यावसायिक भागीदार म्हणून होता. मात्र भागीदारीत वाद निर्माण झाल्यामुळे विजय ओखीरकर याने आपले अडीच लाख रुपये शेट्टी यांच्याकडे मागितले. मात्र अनुप शेट्टी हे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. याच रागातून काल (24 एप्रिल) दुपारी तीन वाजता हॉटेल वीरा रेसिडेन्सी हॉटेलजवळ अनुप शेट्टी यांच्यावर गोळीबार करुन त्यांना धमकावत इनोव्हा गाडीत जबरदस्तीने टाकून सात जणांनी त्यांच्या अपहरण केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी एकूण बारा पथके तयार करुन अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केला.

अपहरणकर्ते ठाण्यातील शहापूरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  नंतर शहापूरच्या दिशेने पोलिसांची पथके रवाना झाली. अपहरणकर्ते शहापूर परिसरात असल्याचं समजताच पोलिसांनी शहापूर भागातील रस्त्यावर वाहने आडवी लावून अपहरणकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांच्या गाड्या आपल्या गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्या जवळील बंदुका काढून अपहरणकर्त्यांवर रोखल्यानंतर आरोपी पोलिसांना शरण आले आणि अपहृत हॉटेल व्यवसायिकाची सुखरुप सुटका केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement