COVID19: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; मुंबई, पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत आणखी भर

राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आज मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात 9 तर, पुणे जिल्ह्यात आणखी 2 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही लोकांच्या गैरजबाबदारीपणामुळेच कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 2 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 25 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने 170 हून अधिक देशात प्रवेश केला आहे. कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. भारतातही कोरोना विषाणूचे जाळे वेगाने पसरत आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुंबईत 151 तर, पुण्यात 57 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबई आणि पुणे शहरातील लोक जबाबदारीने वागत नसल्याने येथील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. हे देखील वाचा- मुंबई: तबलिगींविरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी धारावी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

एएनआयचे ट्वीट-

एएनआयचे ट्वीट-

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही.