Mumbai Coastal Road Accident: वेगाची नशा जीवावर बेतली! मुंबई कोस्टल रोडवर BMW हवेत उडून कोसळल्याने 3 तरुणांचा मृत्यू
मुंबईतील कोस्टल रोडवर लोटस जेट्टीजवळ भरधाव बीएमडब्ल्यू कोसळून झालेल्या अपघातात एनएमआयएमएस महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, एक विद्यार्थी सुदैवाने बचावला आहे. मरीन ड्राइव्हहून परतताना ही दुर्घटना घडली.
मुंबईतील कोस्टल रोडवर (Mumbai Coastal Road) रविवारी (20 सप्टेंबर) पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. लाला लजपतराय महाविद्यालयासमोर, लोटस जेट्टीजवळ पहाटे सुमारे 5.20 वाजता भरधाव वेगात जाणारी बीएमडब्ल्यू कार कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरीन ड्राइव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जात असताना अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अतिवेगामुळेच ही कार पुलावरून खाली कोसळली.
कोस्टल रोड अपघातातील मृतांची ओळख आणि बचावलेला तरुण
अपघातातील जखमींना तत्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. यापैकी 21 वर्षीय शनय गज्जल आणि 17 वर्षीय धीर्य सेठ यांची ओळख पटली असून, तिसऱ्या मृताची ओळख अद्याप उघड झालेली नाही.
गाडी चालवणारा सनय गिज्जर होता, तर उर्वरित तिघे या गाडीत प्रवासी होते. चालकाच्या शेजारी बसलेला 20 वर्षीय ओनी आदित्य ओसवाल सुदैवाने या अपघातातून बचावला आहे.
कोस्टल रोड वरील बीएमडब्लू कारचा अपघात व्हिडिओ
🚨💥 मुंबईत कोस्टल रोडवर अतिवेगामुळे बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात!
मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीकडे जाणाऱ्या कारच्या अपघातात ३ जणांचा मृत्यू, १ गंभीर!
🔹 मृत: शनाय गज्जल (२१), धैर्या सेठ (१७) आणि २५ वर्षीय अज्ञात तरुण.
🔹 जखमी: २० वर्षीय तरुण नायर रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये… pic.twitter.com/5gqN6SXSG2
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 20, 2026
कोण होते हे तरुण?
हे सर्व तरुण जुहू येथील एनएमआयएमएस महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, पेइंग गेस्ट (PG) निवासात राहत होते. चौघेही मूळचे अहमदाबादचे रहिवासी होते आणि मरीन ड्राइव्हला फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात घडला.
मुंबईत राहणारे या मुलांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असून, त्यांचे पालक गुजरातहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
या अपघाताच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुंबई कोस्टल रोड हा दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकाशी जोडणारा 10.58 किलोमीटर लांबीचा हायस्पीड फ्रीवे आहे.
या दुर्घटनेमुळे तरुणांमध्ये वाढत्या अतिवेगाच्या प्रवृत्तीबाबत आणि कोस्टल रोडसारख्या हायस्पीड मार्गांवरील सुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2026 11:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

