मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: वरळी ते धारावी चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

वरळी (Worli), धारावी (Dharavi), सायन-कोळीवाडा (Sion Koliwada), वडाळा (Wadala), माहीम (Mahim) या मतदारसंघात प्रामुख्याने मराठी मुंबईकर राहत असल्याने सामान्य आणि उच्च मध्यमवर्गीय या पट्ट्यातील मतदार 21 ऑक्टोबरला कुणाला मतदान करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Maharashtra Assembly Elections 2019 | File Image

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबई शहरात  असणार्‍या दहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा चुरशीची लढाई बघायला मिळणार आहे. यंदा राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे यंदा राज्यासह मुंबई शहरावर कब्जा करण्यासाठी सार्‍याच राजकीय पक्षामध्ये चुरस बघायला मिळत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबई शहरातील प्रमुख मतदारसंघांवर सार्‍याच राजकीय पक्षांचा डोळा आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी सारेच पूर्ण प्रयत्न करत आहे. वरळी (Worli), धारावी (Dharavi), सायन-कोळीवाडा (Sion Koliwada), वडाळा (Wadala), माहीम (Mahim) या मतदारसंघात प्रामुख्याने मराठी मुंबईकर राहत असल्याने सामान्य आणि उच्च मध्यमवर्गीय या पट्ट्यातील मतदारांची मनं आणि मतं जिंकणार्‍याला अधिक फायदा आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघ 

वरळी विधानसभा मतदारसंघ 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील हाय प्रोफाईल मतदारसंघांमधील एक म्हणजे वरळी विधानसभा संघ. यंदा शिवसेना युवा प्रमुख आणि ठाकरे घराण्यातील पहिला सदस्य निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या वरळीमधून यंदा आदित्य ठाकरे यांच्याविरूद्ध बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांचं आव्हान आहे. मात्र या मतदारसंघावर प्रामुख्याने शिवसेनेची सत्ता राहिली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदार संघ का निवडला?  

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ 

सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये सध्या भाजपा आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन सत्तेमध्ये आहेत. यंदाही भाजपाने त्यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर कॉंग्रेसच्या गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर मनसेने अनंत कांबळे यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं आहे. हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स.

माहिम विधानसभा मतदारसंघ 

मराठी माणसांचं प्राबल्य असलेला माहिम मतदार संघ मुंबईतील महत्त्वाच्या मतदार संघांपैकी एक आहे. शिवसेना भवन या मतदारसंघात असल्याने तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थानही याच मतदार संघाने निवडणूकीत माहिम हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ समजला जातो. यंदा शिवसेनेचे सदा सरवणकर मनसेचे संदीप देशपांडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. कॉंग्रेसनेही प्रविण नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

वडाळा विधानसभा मतदारसंघ 

वडाळा हा कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई शहरातील बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. या विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने कालिदास कोळंबकर यांना 2014 साली विधानसभेत पाठवले होते. मात्र लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर आता कालिदास कोळंबकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यंदा ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरूद्ध शिवकुमार लाड हा  उमेदवार लढणार आहे. तर मनसेने देखील आनंद प्रभू यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

धारावी विधानसभा मतदारसंघ 

धारावी हा कॉंग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. प्रामुख्याने अनुसुचित जाती, जमातीमधील लोक, मुस्लिम मतदारांचं मताधिक्य असलेल्या या विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचे येथे वर्चस्व आहे. वर्षा गायकवाड यांंनी मागील 15 वर्ष या  मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यंदा कॉंग्रेसच्या वर्ष गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेच्या आशिष मोरे यांचं आव्हान आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.