मुंबई: कॅप्टन अमोल यादव यांच्या भारतीय बनावटीच्या Aircraft ला उड्डाण मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर पुढील प्रकल्पासाठी जागा देण्यात येणार-उद्योगमंत्री सुभाष देसाई
अशा या भारतीय बनावटीच्या सहा सीटर विमानाच्या आणखी दोन चाचण्या होण्यास बाकी आहे.
मुंबईतील कॅप्टन अमोल यादव (Amol Yadav) यांनी त्यांच्या घराच्या छतावर बनवलेल्या विमानाच्या उड्डाणाचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. अशा या भारतीय बनावटीच्या सहा सीटर विमानाच्या आणखी दोन चाचण्या होण्यास बाकी आहे. परंतु विमानाचे उड्डाण करण्यासाठी अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे ही अमोल यादव यांनी स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभुमीवर आता अमोल यादव यांच्या एअरक्राफ्टला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून मानत्या मिळाली तर पुढील प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्या वतीने जागा देण्यासह सहकार्य करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
सुभाष देसाई यांनी याबद्दल अधिक माहिती देत पुढे असे ही म्हटले आहे की, ज्या वेळी अमोल यादव यांनी त्यांचे हे विमान मेक इन इंडिया योजनेअंतर्गत ठेवले होते त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले होते. तर आता अमोल यादव यांच्या या उद्योग किंवा निर्मितीच्या संदर्भात एक बैठक सुद्धा सुभाष देसाई यांनी बोलावली असून त्यात ते स्वत: उपस्थिती लावणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. तर अमोल यांनी पाहिलेले स्वप्न पाहण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे ही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. (आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताचे पाऊल, मुंबईतील पायलट अमोल यादव यांच्या 6 सीटर Aircraft च्या उड्डाण चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण)
जेट एअरवेज मध्ये डिप्युटी चीफ पायलट म्हणून कर्तव्य बजावलेल्या अमोल यांनी घराच्या छतावर 19 वर्ष मेहनत करुन एअरक्राफ्ट टीएसी-300 बनवले होते. एअरक्राफ्ट 2011 मध्ये याच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले होते. परंतु त्यांना याच्या उड्डाणाची परवानगी देण्यात आली नव्हती. असे सांगितले जात आहे की, 1985 मध्ये मुंबईतील शिवकर तळपडे यांनी चौपाटीवर त्यांच्या विमानाचे उड्डाण केले होते. त्यानंतर 122 वर्षानंतर आता मुंबईतीलच कॅप्टन अमोल यादव यांनी स्वत:हून तयार केलेले एअरक्राफ्टचे उडवू शकणार आहेत. कॅप्टन अमोल यादव यांच्या या प्रोजेक्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कौतुक केले होते.