अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
पावसामुळे मुंबईतील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे.
सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला (Mumbai Rains) अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबईतील समुद्रात आज दुपारी 12 वाजून 47 मिंनिटांनी भरती येणार असून 4.45 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यात आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच मुंबई सोमवार रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. हे देखील वाचा- Mumbai Rains Update: मुंबईला पावसानं झोडपलं; पश्चिम रेल्वेवरील वांद्रे-चर्चगेट दरम्यान लोकल सेवा निलंबित
एएनआयचे ट्वीट-
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.