Mumbai: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीत सहभागी झालेल्या 41 हाय-एंड सुपरकार्स केल्या जप्त, पोर्श, ऑडी, लॅम्बोर्गिनी यांचा समावेश
ज्या कार मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी बहुतांश मुंबईतील नामवंत उद्योगपतींची मुले आहेत.
मुंबईमध्ये (Mumbai) 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीबाबत (Republic Day Rally) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काही तरुणांनी परवानगी न घेता कार रॅली काढली होती. आता या रॅलीत वापरण्यात आलेल्या 41 आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून, त्यांच्या मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. प्रजासत्ताक दिनी बेकायदेशीर रॅली काढल्याबद्दल वांद्रे कुर्ला पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांमध्ये फेरारी, पोर्श, लॅम्बोर्गिनी, मर्क-एडिस कार, ऑडी, जग्वार, बीएमडब्ल्यू सारख्या हाय-एंड सुपरकार्सचा समावेश आहे.
या कार मालकांना त्यांच्या गाड्या परत मिळवण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. ज्या कार मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी बहुतांश मुंबईतील नामवंत उद्योगपतींची मुले आहेत. हे लोक मुख्यत्वे मुंबईतील नेपियन सी रोड, वांद्रे, खार आणि अंधेरी बाजूचे रहिवासी आहेत. मुंबई पोलिसांनी कार मालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अहवालानुसार, एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून ही रॅली आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही रॅली 26 जानेवारीला बीकेसी ते अटल ब्रिजपर्यंत काढण्यात आली होती. जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आयोजित केलेल्या या रॅलीने 6 फेब्रुवारीपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांच्या मेळाव्यावर मर्यादा घालण्याच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले. (हेही वाचा: Thane Accident: सहलीसाठी निघालेल्या बसचा भिवंडीत अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)
इतकेच नाही तर, हा कार्यक्रम BookMyShow या ऑनलाइन तिकीट पोर्टलवर सूचीबद्ध करण्यात आला आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्याची जाहिरातही करण्यात आली. सकाळी 6 वाजता रॅलीच्या नियोजित प्रारंभापूर्वी बीकेसी पोलिसांनी जियो वर्ल्ड ड्राईव्हवर पोहोचून कारवाई केली. बीकेसी पोलिसांनी नमूद केले की, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनादरम्यान अनेक कार मालकांनी गेल्या दशकभरात अशाच रॅलींमध्ये भाग घेतला होता. मात्र, यंदा त्यांनी कार्यक्रमाची परवानगी घेतली नाही.